ताज्याघडामोडी

पाच वर्ष मुख्यमंत्री’पद दिलं तर शिवसेना पुन्हा भाजपसोबत जाणार?

मुंबई: दोनच दिवसांपुर्वी रामदास आठवले असं म्हणाले की, शिवसेना आणि भाजपानं अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदवाटून घ्यावं. फडणवीसांनाही ते मान्य असेल. दोन्ही पक्षांनी एकत्र येण्यासाठी हा फॉर्म्युला नवीन नाही. पण जी परिस्थिती आता नव्यानं तयार होताना दिसते आहे त्याला पुन्हा महत्वं आलेलं आहे. संजय राऊत यांनी सामनामध्ये जे रोखठोक लिहिलं आहे. त्यातही त्यांनी यावर शब्द खर्च केलेले आहेत. याचाच अर्थ असा की, पुन्हा एकदा अडीच वर्षाचा मुख्यमंत्री, पाच वर्षाचा मुख्यमंत्री ह्या शब्दांना राज्याच्या राजकारणात महत्व येत आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीनं किंवा काँग्रेसनं कुठली खेळी केली तर शिवसेना पुन्हा भाजपसोबत युती करायला कचरणार नाही, हे दाखवण्याचा प्रयत्न तर शिवसेना करत नाही ना?

मुख्यमंत्रीपदाबाबत काय आहे रोखठोकमध्ये?

काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदावर दावा नाही. पण राष्ट्रवादीचा तो दावा असल्याची जोरदार चर्चा ठाकरे सरकार बनलं तेव्हापासून आहे. राऊतांनी मात्र आजच्या रोखठोकमध्ये शिवसेनेचाच ‘पाच वर्ष मुख्यमंत्री’ हा शब्द असल्याची आठवण आघाडीसह सगळ्या नेत्यांना करुन दिली आहे. त्यामुळेच ह्या सरकारला अडीच वर्ष पूर्ण होताच राष्ट्रवादीचा मुख्ममंत्री होईल अशी जी चर्चा सध्या सुरु आहे त्या पार्श्वभूमीवर राऊतांच्या ‘शब्दाला’ महत्व प्राप्त होतं. हे सरकार पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल असं जरी वारंवार राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सांगितलं असलं तरीसुद्धा उद्धव ठाकरेच पाच वर्ष मुख्यमंत्री असतील हे कुणीही उघडपणे सांगताना दिसत नाहीत. त्यामुळेच संभ्रम वाढतो आहे.

मग भाजपसोबत जाणार शिवसेना?

खरोखरच सरकारला अडीच वर्ष पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रवादी ‘मुख्ममंत्री’पदाची खेळी करणार का? ह्या प्रश्नाचं उत्तर राष्ट्रवादीचे नेते तसं स्पष्ट देणार नाहीत. पण तो प्रश्न गृहीत धरुन त्याचं उत्तर आताच देण्याचा प्रयत्न राऊतांनी रोखठोकमध्ये केला आहे. राष्ट्रवादीनं खरोखरंच असा कुठला दबाव आणला तर भाजपसोबत जाण्याचा मार्ग मोकळा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न राऊतांनी रोखठोकमध्ये केला आहे. तसं नसतं तर उद्धव ठाकरे आणि मोदी यांच्यातले संबंध कसे ‘उत्तम’ आहेत हे सांगण्याचा खटाटोप त्यांनी केला असता का?

दिल्ली भेटीत मोदींनी कुठला शब्द दिला?

दिल्लीत उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्या 30 मिनिटे स्वतंत्र, वैयक्तिक अशी भेट झाल्याची आधी चर्चा होती. त्यावर आज राऊतांनी शिक्कामोर्तब केलं आहे. याच भेटीत शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाबाबत काही शब्द मोदींनी दिला आहे का याची चर्चा रंगली होती. त्यावर राऊत म्हणतात-‘शिवसेनेला मुख्यमंत्रीपद हवेच होते. भाजपने शब्द दिला होता तो पाळला नाही. या वेदनेतून शिवसेनेने नव्या सरकारची मुहूर्तमेढ रोवली. आज शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद आहे व स्वत: ‘ठाकरे’ त्या पदावर विराजमान आहेत. राजकारण बदलानंतर मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडेच राहील, असा शब्द दिल्लीच्या धावत्या भेटीत पंतप्रधानांकडून मिळाला असण्याची सुतराम शक्यता नाही. कारण महाराष्ट्रात भाजपचा झगडाही मुख्यमंत्रीपदासाठीच आहे. बाकी सर्व गोष्टी दुय्यम ठरतात’.

काही सवाल?

संजय राऊतांनी मुख्यमंत्रीपदावर मोदींनी कुठलाही शब्द दिलेला नाही हे स्पष्ट करण्याची घाई का केली किंवा त्यांच्यावर ती वेळ का आली? भाजप-सेना एकत्र येण्याला अजूनही पाच वर्षे मुख्यमंत्रीपद हाच मुख्य अडथळा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न शिवसेना करते आहे का? राजकारण बदलानंतर शिवसेनेचाच मुख्यमंत्री राहील असा शब्द पंतप्रधानांकडून मिळाला नसण्याची सुतराम शक्यता नाही असं राऊत का म्हणतायत? राऊत शिवसेनेचे सर्वोच्च नेत्यांपैकी एक आहेत, ते शक्यता अशक्यता बोलण्यापेक्षा ठोसपणे का सांगत नाहीत? मोदी-उद्धव भेटीचा वापर शिवसेना आघाडीच्याच नेत्यांवर दबाव आणण्यासाठी करते आहे का? मुख्यमंत्रीपद नाही तर इतर सगळ्या गोष्टी दुय्यम ठरतात असं राऊत रोखठोकमध्ये का म्हणतायत? म्हणजेच शिवसेनेला पाच वर्षे मुख्यमंत्रीपद देऊ असं भाजपनं जाहीर केलं तर युतीचा मार्ग मोकळा होईल असं तर राऊत सांगू इच्छित नाहीत?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *