गुढीपाडवा व नववर्षानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीने आयोजित केलेल्या सुशील कुलकर्णी व सहकारी प्रस्तुत “मैफिल सप्तसुरांची” या कार्यक्रमाने पंढरपूरकर रसिकांना मंत्रमुग्ध केले. प्रथम श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे व्यवस्थापक मनोज क्षोत्री व सर्व कलाकार यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
सर्वप्रथम पंचतुंड नररुंड मालधर या नांदिने मैफिलीची सुरुवात करून त्यानंतर आम्ही विठ्ठलाचे वारकरी, मंदिरात अंतरात, देव देव्हाऱ्यात नाही, पद्मनाभा नारायणा, झिनी झिनी वाजे विन, मधुबन मे राधिका, मर्म बंधातली ठेव ही अशा अनेक गीताचे सुरेख सादरीकरण झाले. त्यानंतर गायलेल्या गीतरामायणाच्या सादरीकरणाने कार्यक्रमाची रंगत आणखीनच वाढली. यामध्ये अप्पासाहेब चुंबळकर, श्रीकांत कुलकर्णी, प्रसाद खिस्ते, योगिनी ताठे, स्वराली सावळे यांनी आपल्या सुरेल आवाजामध्ये रसिकांची मने जिंकली. ऋतुजा फुलकर यांच्या निवेदनामुळे कार्यक्रम अधिकच रंगतदार झाला.
मैफिल सप्तसुरांची या कार्यक्रमाचे संयोजक सुशील कुलकर्णी यांची उत्तम तबला साथ व आप्पासाहेब चुंबळकर यांची हार्मोनियम साथ यामुळे कार्यक्रमाची उंची अधिकच वाढली.