याच पार्श्वभूमीवर, चुकीची माहिती पसरवली जाऊ नये म्हणून आता अखेर सोशल मीडियाकडून काही पावलं उचलली गेली आहेत. चुकीची माहिती असलेली ट्विट्स फ्लॅग करण्याची सुविधा अलीकडेच ट्विटरने दिली होती. आता फेसबुकनेही माहितीची सत्यता दर्शवण्यासाठी एक उपक्रम हाती घेतला आहे. कोविड-19 आणि त्यावरील लशी, हवामानबदल, निवडणुका आणि अन्य अनेक विषयांबद्दल चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती फेसबुकवर शेअर केली गेली असेल, तर ती कमीत कमी लोकांपर्यंत पोहोचावी, यासाठी फेसबुकने एका तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे.
फेसबुककडून ब्लॉगमध्ये याबद्दल माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे फेसबुकचे युजर्स एखाद्या पेजवरची किंवा प्रोफाइलवरची पोस्ट वाचत असतील, तर त्याबद्दल फॅक्ट-चेकरचं काय मत आहे, हे त्यात दिसणार आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’ने त्याबद्दलची अधिक माहिती दिली आहे.
फॅक्ट चेकिंग अर्थात शेअर केल्या जाणाऱ्या माहितीची सत्यता पडताळण्यासाठी फेसबुकने जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या संस्थांशी भागीदारी केली आहे. भारतात एएफपी-हब, बूम, फॅक्ट क्रेसेंडो, फॅक्टली, इंडिया टुडे फॅक्ट चेक, न्यूजचेकर, न्यूजमोबाइल फॅक्टचेकर, द क्विंट आणि विश्वास डॉट न्यूज या नऊ संस्था फेसबुकसाठी फॅक्टचेकर म्हणून काम करतील. अमेरिकेतही अशाच 10 वेगवेगळ्या संस्था फॅक्टचेकर म्हणून काम करणार आहेत.
हे फॅक्ट-चेकर्स फेसबुकवर शेअर केल्या जाणाऱ्या माहितीची सत्यता पडताळून खोटी, चुकीची माहिती शेअर करणारी पेजेस त्यांच्याकडून फ्लॅग पेजवर जाईल, तेव्हा त्याला ‘हे पेज वारंवार चुकीची माहिती शेअर करत आहे,’ असा संदेश मिळेल. त्यावर क्लिक केल्यानंतर युजर्सना अधिक माहिती मिळेल. तसंच, त्या पेजवरच्या कोणत्या पोस्ट्स फ्लॅग करण्यात आल्या होत्या, ही यंत्रणा कशी आहे, याबद्दलची माहिती युजरला मिळेल. त्यामुळे त्या पेजवरची माहिती वाचायची की नाही, ते पेज फॉलो करायचं की नाही, याचा निर्णय युजर सद्सद्विवेकबुद्धीने घेऊ शकेल.
खोट्या माहितीला आळा घालण्यासाठी फेसबुकने आणखी एक पाऊल उचललं आहे. खोटी माहिती शेअर करणाऱ्या आणि त्याबद्दल फॅक्ट-चेकरकडून फ्लॅग करण्यात आलेल्या अकाउंटवरून केल्या जाणाऱ्या पोस्ट्सचं न्यूज फीडमधलं डिस्ट्रिब्युशन कमी केलं जाणार आहे. म्हणजेच अशा पोस्ट्स न्यूजफीडमध्ये जास्त लोकांना दिसणारच नाहीत. पूर्वी अशी कारवाई पेजेस, ग्रुप्स, इन्स्टाग्राम अकाउंट्स आणि डोमेन्सवर केली जायची. आता पर्सनल फेसबुक अकाउंट्सवरही अशी कारवाई केली जाणार आहे.