ताज्याघडामोडी

कामावर जाऊ नका, गेलात तर हातात बांगड्या भरून जा !

राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन धुमसत आहे. एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण व्हावं, या मागणीसाठी कर्मचारी आग्रही असून अनेक ठिकाणी काम बंद आंदोलन करण्यात येत आहे. अशातच रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली एसटी आगारातील एक बसचालक चक्क हातात बांगड्या घालून कामावर हजर राहिल्याचं पाहायला मिळालं आहे.

बसचालक अशोक वनवे हे रविवारी दुपारी ३ वाजता सुटणाऱ्या दापोली-ठाणे या शिवशाही बसवर ड्युटीसाठी हातात बांगड्या भरून हजर झाले आणि शिवशाही बस घेऊन ते ठाण्याकडे रवाना झाले आहेत. हे चालक मूळचे बीड येथील असून त्यांचे कुटुंब नोकरीनिमित्त दापोलीत वास्तव्यास आहे. आपल्या पत्नीने कामावर जाऊ नका, गेलात तर हातात बांगड्या भरून जा असं म्हटल्याचं अशोक वनवे यांनी सांगितलं आहे.

मात्र कामावर न आल्यास आपल्याला कामावरून काढून टाकतील ही भीतीही वनवे यांच्या मनात होती. त्यामुळे अखेर बांगड्या भरूनच कामावर हजर होण्याचा निर्णय अशोक वनवे यांनी घेतला.

राज्यात सध्या एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. राज्यभरातील अनेक ठिकाणी आंदोलन सुरू असलं तरी कोकणात एसटी बस सेवा सुरळीत असल्याचं चित्र आहे. मात्र आता दापोली एसटी आगरातही कर्मचारी आंदोलनाची ठिणगी पडल्याचं अशोक वनवे यांच्या निमित्ताने पाहायला मिळालं आहे.

‘आमचे कर्मचारी आत्महत्या करत आहेत. त्यामुळे यंदा आमच्या कुटुंबाने दिवाळी साजरी केली नाही. अवघ्या १३ हजार रुपये पगारात घर कसे चालवायचे, हा प्रश्न आमच्या समोर आहे,’ अशा शब्दांत बसचालक अशोक वनवे यांनी आपली व्यथा सांगितली.

दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांत अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं आहे. त्यामुळे आगामी काळात राज्य सरकार या कामगारांच्या मागण्यांची पूर्तता करणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *