गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

भाजपच्या उपजिल्हाध्यक्षावर जीवघेणा हल्ला

उल्हासनगर, 14 मार्च : उल्हासनगर (Ulhasnagar) भाजपचे उपजिल्हाध्यक्ष जयकुमार शर्मा यांच्यावर उल्हासनगरमध्येच जीवघेणा हल्ला (Attack on BJP leader) करण्यात आला आहे. या हल्ल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. या जीवघेण्या हल्ल्यामध्ये शर्मा यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना उल्हासनगरच्या खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे.

उल्हासनगर कॅम्प नंबर 3 भागातील इंदिरा गांधी मार्केट परिसरात जयकुमार शर्मा यांच्या मालकीचे घर आहे. यात सध्या ते राहत नसून ते घर त्यांनी भाड्याने दिले आहे. गेल्या काही महिन्यांपासून या घरात भाडेकरू राहतात. मात्र या भाडेकरूंना रात्रीच्या सुमारास काही अज्ञात लोक त्रास देतात. हे भाडेकरू रात्रीच्या वेळेस झोपल्यावर त्यांचा दरवाजा वाजवून त्यांना त्रास देण्याचा प्रकार काही अज्ञातांकडून सुरू होता.गेल्या काही दिवसांपासून होत असलेला हा त्रास आणखीच वाढल्यानंतर अखेर भाडेकरूंनी घर मालक जयकुमार शर्मा यांना ही बाब सांगितली. मात्र कामाच्या व्यापातून वेळ मिळत नसल्याने त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. शनिवारी रात्री पुन्हा रात्री 1 वाजण्याच्या सुमारास भाडेकरूंनी शर्मा यांच्याकडे कोणीतरी दार वाजवत असल्याची तीच तक्रार केल्यानंतर शर्मा तिथे गेले.यावेळी घराच्या गल्लीत काही लोक अंधारात दबा धरून  बसले हो. शर्मा यांनी त्यांना कोण आहे अशी विचारणा केली. मात्र तू कोण आहे असे प्रतिउत्तर या अज्ञातांनी त्यांना दिले. त्यानंतर शर्मा हे घराच्या मागच्या बाजूने गेले असता अज्ञातांनी तुझीच वाट बघत होतो असे म्हणत त्यांच्यावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागला असताना सुद्धा त्या अवस्थेत त्यांनी पोलीस ठाणे गाठले. मात्र त्यांना वैद्यकीय उपचारांची तात्काळ आवशकता असल्याने पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर सध्या उल्हासनगरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, या हल्ल्याप्रकरणी कुणाल आणि हरेश या दोघांवर उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांच्या शोध घेत आहेत. मात्र शर्मा यांच्या भाडेकरूंना त्रास देणे आणि त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करणे याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *