Uncategorized

बाहुबली सावकारांकडून केला जातोय ”मुळशी पॅटर्न”चा छुपा अवलंब ?

संतांच्या वास्तव्याने आणि पदस्पर्शाने पावन झालेल्या या पंढरीस देशभरात भुवैकुंठ म्हणून ओळखले जाते.येथे आल्यानंतर श्री विठ्ठलाच्या चरणी लिन झाल्यानंतर प्रत्यक्ष स्वर्गसुखाचा अनुभव मिळतो अशी श्रध्दा महाराष्ट्रभर जोपासली जाते.मात्र या पंढरी नगरीची दुसरी काळी बाजू मात्र उभ्या महाराष्ट्राला अज्ञात असून येथील गुंडगीरी,राजकारण आणि गुंडगीरी याचे साटेलोटे,अवैध धंदे आणि त्याच बरोबर येथील सर्वसामान्य कष्टकरी जनतेचे खर्या अर्थाने शोषण करणारी सावकारी हे इथल्या समाजमनावर आघात करणारे फार मोठे बलशाली घटक आहेत असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
पैशातून सत्ता अणि पुन्हा सत्तेतून पैसा याचे चांगले गणीत उमजलेल्या बाहुबलींनी सावकारीच्या माध्यमातून अनेक गरोगरीब व अर्थिक द्रष्टया अडचणीत आलेल्या पंढरपूरकरांना पुरते लुबाडले असल्याचे उघड गुपती साऱ्या पंढरपूरकरांना माहीत आहे.

खरे तर सावकारी हा गरजू आणि धनवान यांच्यातील संमतीने झालेला व दोघांनाही मान्य असलेला व्यवहार असतो.मात्र अडचणीच्या वेळी जेव्हा अर्थिक मदत मिळविण्याचा कुठलाही वैध मार्ग उरलेला नसतो तेव्हा सामान्य व्यक्ती सावकारी कर्जाकडे वळतो.शहरातील सारेच वैध-अवैध सावकर लूटारू आहेत, लुबाडणूक करणारे आहेत अथवा फसवणूक करुन मालमत्ता हडप करणारे आहेत असेही आम्हास म्हणावयाचे नाही.शहरात या सावकारीच्या माध्यमातून एक पर्यायी अर्थव्यवस्था उभारली गेलेली आहे.व्यापारी द्रष्टीकोण ठेवून आपल्याकडील शिल्लक पैसा सामान्य व गरजू लोकांच्या उपयोगासाठी यावा व त्यातून आपणासही अर्थिक लाभ मिळावा या हेतून शहरात प्रतिमाह दरशेकडा दोन-तीन रुपये व्याज दराने कोटयावधीचे व्यवहार होत असतात व अतिशय प्रामाणिकपणे हे व्यवहार पुर्णही केले जात असतात. मात्र या व्यवसायात काही स्थावर मालमत्ता संग्रहाचा छंद असलेल्या,सत्ताकांक्षी व महत्वकांक्षी लोकांचाही मोठा वरचष्मा असून एखाद्याची व्यवसायीक गरज म्हणून कर्ज देण्याच्या प्रवृत्ती ऐवजी एखाद्याची स्थावर मालमत्ता कशी घशात घालता येईॅल याच हेतूने रकमा व्याजाने देवून त्यावर दरमहा दहा-वीस टक्के व्याज आकारणी बरोबरच व्याजाची रक्कम वेळेवर न दिल्यास प्रतिदिवस हजारोंच्या दंड आकारणारे काही महाभाग पंढरीत आढळून येतात.मात्र त्यांच्या दहशतीमुळे त्यांच्यविरोधात तक्रार करण्याची कर्जदारांची हिंमत होत नसल्याची चर्चा सातत्याने होते.

यांच्या सावकारीचे वैशिष्ठय म्हणजे अडचणीतील सावज शोधण्यासाठी अशा सावकारांनी काही गोडबोल्या दलालांची खास मोठया कमिशनवर नियुक्ती केली असून हे दलाला दृश्य स्वरुपात या सावकारांच्या सोबत कधीही वावरत नसतात.परंतू अडचणीत असलेले मात्र स्थावर मालमत्ता,स्वत:च्या मालकीचे घर,प्लॉट असलेल्यांना शोधून त्याची अर्थिक अडचण सहानुभूतीने ऐकुन घेत त्याच्याशी घसट वाढवित त्याला आपल्या जाळ्यात ओढण्याची पध्दतशीर खेळी खेळली जाते.असे गोडबोले दलाल सुरुवातीच्या काळात अशा अडचणीतील व्यक्तींना काही हजारात उसनवारी मदत करुन त्याच्याशी आपुलकीचे नाते जोडतात.त्यानंतर एक चांगला सल्लागार म्हणून आपण त्याचे कसे हित पहात आहोत याची त्याला जाणीव करुन देतात मात्र या पाठीमागे मात्र त्याचा एकच हेतू असतो ,आपण ज्या सावकारासाठी काम करीत आहोत त्याच्या दारात या अडचणीतील व्यक्तीस नेवून सोडणे,या दलालाने तो पर्यंत या अडचणीतील व्यक्तीची एकुण अर्थिक गरज,त्याची स्थावर मालमत्ता आणि त्याच्या पाठीराख्यांची पात्रता याचा पुरे पूर अंदाज घेतलेला असतो.या कर्जदाराचा सारा बायोडाटा आपल्या सावकारापर्यंत पोहचविण्याचे काम या दलालाने पार पाडलेले असते. मोठया हुशारीने हे गोडबोले दलाल सहानुभूती दाखवत जेव्हा या सावकारांच्या दारात सर्वसामान्य कर्जदारांना नेवून सोडतो तेव्हा सुरुवातील हा व्यवहार अगदी कमी टक्केवारीत ठरलेला असतो.परंतू त्याच वेळी अतिशय गोडीगुलाबीने काही अटी घातल्या जातात त्या मध्ये सर्वात महत्वाची अट असते ती परतफेडीच्या मुदतीची.आणि एकदा का ही मूदत उलटून गेली की मग सुरु होते मनमानी व्याज आणि दंडाचे सत्र आणि याच वेळी असे गोडबोले दलाल आपले खरे रुप प्रगट करतात.मी मध्यस्थी केलीय आता मला अडचणीत आणू नका अशी कर्जदारास तंबी दिली जाते शेवटी त्याची स्थावर मालमत्ता सावकराच्या घशात घालण्याची खेळी सुरु होते.आणि मग साम,दाम,दंड भेद याबरोबर राजकीय लागेबांधे याचा पध्दतशीर वापर करीत हे मुजोर सावकार अशा कर्जदारांची मालमत्ता गिळकृंत करतात याचा अनुभव अनेक अन्यायग्रस्त पण भयग्रस्त असल्याने बोलू शकत नसलेल्या कर्जदारांनी घेतला आहे.        पंढरपूर शहर पोलीस ठाणे आणि सहा.निबंधक कार्यालय पंढरपूर यांनी नुकतीच पंढरपूर शहरात एक मोठी कारवाई करीत एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्या विरोधात गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली होती.मात्र एखाद्या राजकीय पक्षाच्या अथवा सामाजिक वर्तुळात प्रतिष्ठित म्हणून वावरणाऱ्या सावकारा विरोधात हि पहिलीच कारवाई नव्हती.जेव्हा जेव्हा अन्यायग्रस्त कर्जदाराने तक्रार दाखल केली आहे अशा बहुतांश प्रकरणात पोलिसांनी कारवाई केल्याचे दिसून येते.मात्र अनेकवेळा अन्यायग्रस्त कर्जदाराच्या होणाऱ्या किंवा झालेल्या छळाच्या सुरस कथा पंढरपूर शहर तालुक्यात चर्चिल्या जातात मात्र कर्जदारच भीतीपोटी तक्रारीसाठी पुढे येत नसल्याने पोलीस प्रशासन देखील हतबल ठरल्याचे दिसून येते.   

बेकायदा सावकारी हा कायदेशीर शब्द आहे पण कमी व्याज दराने व संमतीने आजही हजारो सावकाराचे व कर्जदारांचे व्यवहार हे सन्मानाने होताना दिसून येतात.पण अल्पावधीत बारा हजाराचे लाख करण्याचा ध्यास घेतलेल्या  बाहुबली ”टेक्निक” हस्तगत केलेल्या लोकांपासून सर्वसामान्य जनतेला होणारा त्रास रोखण्यासाठी व अशा बाहुबली सावकारांना सामाजिक व राजकीय प्रतिष्ठा मिळू न देण्याची जबाबदारी हि प्रभावशाली राजकीय नेते,पक्ष प्रमुख आणि जागरूक सामान्य नागिरक यांची असून त्यांनी ती प्रामाणिकपणे पार पाडणे तितकेच गरजेचे झाले आहे.                   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *