मराठी कवितेबद्दल थोडेसे
सगळीकडे कित्येक गोष्टींची टंचाईची परिस्थिती असताना, कवींच्या संख्येत होणारी वाढ ही एक सुखद घटना आहे असे म्हणावे लागेल. अर्थात रसिकांच्या दृष्टीने ही गोष्ट कितपत सत्य आहे हे पहावे लागेल? संख्येत होणारी वाढ ही गुणात्मक असावी असे रसिकांना (खरे म्हणजे जाणकारांना) वाटत असेल तर त्यात काही गैर नाही. त्यामुळे केवळ संख्येने होणारी वाढ रसिकांना कितपत आनंद देईल अशी एक शंका वाटणे सहाजिकच आहे.
आचार्य अत्रे यांनी त्यांच्या एका भाषणात म्हटले होते की कविता ही एक गाण्याची गोष्ट आहे, गद्या प्रमाणे वाचण्याची नाही. म्हणजे जर ती गाता येत नसेल तर ती कविता नव्हे. अर्थात आपली प्राचीन परंपरा ही गेय कवितांचीच आहे यात वाद नाही. आपल्या संतांनी जे अभंग लिहिले त्यातून अध्यात्मा बरोबरच जगण्याचेही तत्वज्ञान सांगितले आहे. आपल्या संतांनी ज्या काळात अभंग लिहिले त्या काळात वाचणारे लोक तर फारच कमी होते. अशा वेळेला त्यांनी जे काव्य केले त्याची प्रेरणा ही ईश्वर भक्ती बरोबरच जगणार्या सामान्य लोकांच्या वेदना व त्यांची संस्कृतीच होती. आपल्याकडे प्राचीन साहित्यही पद्य या प्रकारचे आहे गद्य नव्हे.
आधुनिक काळात कविता गेय असणे तितकेसे साहित्यिक दृष्ट्या मान्य नाही. आधुनिक काळातील कविता या गेय नसाव्यात असे मानले जात आहे. त्यामुळे केवळ सरळ वाक्य उलटे करून ,शब्द मागेपुढे करून जरी गद्य लिहिले तरी ती कविता होते असे समजले जात आहे. किंबहुना गाता येते ते गाणे, ते कविता नव्हे असेही मानले जाऊ लागले आहे. पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये जशी कविता असते तशीच ती मराठीत असावी असे आधुनिक साहित्यात मानले जात आहे. तथाकथित समीक्षकांना आपल्या जडबंबाळ शब्दांनी या सार्याला दुजोरा दिला आहे. अशा काळात वृत्तामध्ये कविता लिहिणे हे केवळ बुरसटलेल्या विचाराचे समजले जात नसून साहित्यिक दृष्ट्याही त्याची किंमत कमी लेखली जात आहे. अर्थात यामुळे कवींच्या संख्येत बेफाम वाढ होणे हे सहज शक्य झाले आहे. वृत्तांचे बंधन नाही, यमक असण्याची आवश्यकता नाही, परंतु त्यामध्ये आशय असावा,प्रतिमांचा- प्रतिकांचा वापर असावा अशी आवश्यकता अधुनिक साहित्यात अपेक्षित आहे. त्यामुळे वृत्तांचे किंवा व्याकरणाचे ज्ञान न घेता सुध्दा कवी होता येते असा गैरसमज आजच्या स्वतःला कवी समजणार्या लोकांत झाला आहे. याच कारणाने कवींची संख्या खूप वाढली आहे . कविता करणारे जास्त आणि ऐकणारे कमी अशी अवस्था साहित्य संमेलनात होणे हे ही आजकाल सामान्य झाले आहे. त्यामुळे कवींना आपला नंबर साहित्य संमेलनात लावण्याकरता साहित्य परिषदेच्या पदाधिकार्यांना वा साहित्य संमेलनात असणार्या सर्वेसर्वांना भेटणे आवश्यक झाले आहे. एखाद्याला चांगला कवी किंवा एखादी कविता चांगली आहे असे समजणे यासाठी विशिष्ट फुटपट्टी नाही, त्यामुळे कोणती कविता चांगली व कोणती दुय्यम हे ठरवणे अवघड असते. त्यामुळे कवींचे गट निर्माण होऊ लागले आहेत व कोणाला चांगला व कोणाला दुय्यम ठरवायचे हे ठरू लागले आहे .खरे पाहता अधुनिक काव्यात आपला ठसा उमटवणारे मर्ढेकर व ग्रेस यांच्या कविताही गेय आहेत हे ही सोईस्कर रित्या विसरले जाते आहे.
अशा या आधुनिक काळात स्वर्गीय सुरेश भट आपल्या गेय भावकविता ,गझल याद्वारे आपला ठसा उमटवता झाले. गझल हा विदेशी काव्यप्रकार त्यांनी मराठीत आणला व आपल्या लेखणीद्वारे त्याला एवढ्या उंचीवर नेऊन ठेवले की मराठी गझल म्हणले की सुरेश भट असे नाव एकरूप झाले आहे. त्यांची गझल नुसत्या वृत्तात नाही तर अक्षरगणवृत्तात आहे .रदीफ ,काफिया याबरोबरच वृत्तेही गझलेसाठी आवश्यक आहेत. जो चांगला कवी आहे तो वृत्ताच्या बंधनात राहून आशय संपन्न कविता गझलेच्या रूपात साकार करू शकतो हे स्वर्गीय भटांनी सिद्ध केले आहे. त्यांच्या गझल केवळ कविता नसून सुंदर भावकविता आहेत .जरी त्यांची चित्रपट गीते झाली तरी त्यातील काव्य लोपू शकत नाही हे स्वर्गीय भटांनी सिद्ध केले आहे .परंतु स्वर्गीय भटांच्या मार्गाने जाण्याकरता वृत्तांचा अभ्यास असावयास पाहिजे. वृत्तांच्या मर्यादेत राहून ,यमक,अंत्ययमक, प्रतीके व प्रतिमा यांची योग्य जाण ठेवून कविता करावी लागते. एक एक ओळ लिहिण्याकरता रात्र रात्र जागवावी लागते. हे सर्व करण्यापेक्षा वृत्त-यमक विरहित, गद्यप्राय कवितेच्या मार्गाने जाणे सहज आणि सोपे वाटत आहे . कवी म्हणून प्रसिद्ध होण्यासाठी तो सोपा मार्ग आहे असे समजले जात आहे. आधुनिक काळातील मुक्तछंदतील कविता लिहिणे हे अयोग्य आहे असे माझे म्हणणे नाही .कवितांचे नवीन नवीन प्रयोग करणेही योग्य आहे परंतु हे करताना मराठी प्राचीन परंपरेचा व वृत्त-अलंकाराचे ज्ञान असणे आवश्यक आहे असे मला वाटते.
आताच्या काळात कवींची भाऊगर्दी झाली आहे. त्यातील बर्याच कवींना वृत्तांची , अलंकारांची कल्पना नसावी असे वाटते. मुक्तछंदात जरी कविता केली तरी मुक्तछंदाला सुद्धा एक लय असते हे सुद्धा विसरले जात आहे .मराठी साहित्यात आपले योगदान देण्यापेक्षा आपले नाव चमकत राहावे असे बहुदा त्यांना वाटत असावे .आशय हा कवितेचा आत्मा असतो आणि तो प्रतीकांच्या आणि प्रतिमांच्या साह्याने दर्शवला जातो हे ही सारे विसरले जात आहे .श्रोत्यांना काय आवडते ते देण्यापेक्षा श्रोत्यांना चांगले काय आहे ते देणे हे खर्या साहित्यिकाचे कार्य आहे आणि आता ते कालबाह्य झाले आहे काय असे मंचीय कविता ऐकून वाटत आहे .केवळ हास्य व्यंग कविता मंचावर सादर केल्या पाहिजेत असे वाटणार्या कवींची संख्या सुद्धा लक्षणीय आहे. कविता हा एक गंभीर साहित्यप्रकार आहे हे ही मंचावर विसरले जात आहे . मराठी भाषेकरिता मराठी साहित्य हा आत्मा आहे व मराठी भाषा समृद्ध होण्यासाठी चांगले साहित्य , चांगल्या कविता निर्माण होणे आवश्यक आहे आणि या सार्याचा गंभीरपणे विचार करण्याचाही हा काळ आहे असे मला वाटते !
प्रशांत वेळापुरे पाथेय,
परदेशी नगर पंढरपूर -413304 मो.9422463200
