मुंबईतील भांडुपमध्ये प्रवाशांनी भरलेल्या 605 क्रमांकाच्या बेस्ट बसला अचानक भीषण आग लागली. परिसरातील नागरिकांनी तातडीने हालचाली करत ही आग विझवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. भांडुप स्टेशनवरुन वैभव चौकच्या दिशेने ही बस प्रवाशांना घेऊन निघाली होती. भांडुपच्या अशोक केदारे चौक परिसरात ही बस आली असता बसच्या दर्शनी भागातून धूर येऊ लागला आणि काही वेळातच या बसने पेट घेतला. बस चालकाने प्रसंगावधान राखत बस बाजूला घेत प्रवाशांना मागच्या दरवाजातून बाहेर काढले. तोपर्यंत बेस्ट बसच्या पुढील भागात आग पसरली होती. स्थानिकांनी पाण्याच्या सहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला, अग्निशमन दल देखील घटनास्थळी पोहोचले आणि ही आग विझवण्यात आली. पीक अवर असल्यामुळे घटना घडली त्यावेळी बसमध्ये गर्दी होती. परंतु वेळीच बसला आग लागल्याचं चालकाच्या निदर्शनास येताच प्रवाशांना तातडीने सुखरुप बाहेर काढण्यात यश आले.
