Uncategorized

तलाठी कार्यालय बंद,अनेक गावातील भाऊसाहेब नॉट रिचेबल,हेलपाटे मारून ग्रामस्थ बेजार 

तलाठी,मंडल अधिकारी,ग्रामसेवक हे शासनाच्या नियमानुसार निवासी पदे आहेत.सदर पदाची भरती करतानाच शासनाने नमूद केलेल्या अटींमध्ये कर्तव्याच्या ठिकाणी निवासी रहावे लागेल असे स्पष्टपणे नमूद केलेले असते.मात्र बहुतांश तलाठी,मंडळ अधिकारी व ग्रामसेवक हे कर्तव्याच्या ठिकाणी निवासी रहात नसल्याने ग्रामिण जनतेला मोठया अडचणींचा सामना करावा लागतो.ग्रामस्थांना आपल्या कामासाठी संपर्क करुन तलाठी,मंडल अधिकारी अथवा ग्रामसेवक हे जेथे असतील तेथे जावून आपले काम करुन घ्यावे लागते.अनेक तलाठी कार्यालय बंद तर अनेक तलाठ्यांचे मोबाईल बंद असल्याचा अनुभव वेळोवेळी ग्रामिण जनतेला येत असून त्यामुळे अगदी सकाळपासून हे नागरिक तलाठ्याच्या शोधात असल्याचे दिसून येते.ग्रामसेवकांच्या बाबतीतही हीच परिस्थीती असून ग्रामपंचायतीच्य विविध दाखल्यांसाठी ग्रामसेवकाची गाठ पडणे हे खेड्यातील जनतेसाठी एक मोठे दिव्यच असते.केंद्र आणि राज्यशासनाने अनेक योजना या थेट ग्रामपंचायत पातळीवरुन राबविण्याच्या हेतूने तलाठी,मंडळ अधिकारी,ग्रामसेवक यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविली असून बहुतांश कर्मचारी कर्तव्याच्या ठिकाणी निवासी रहात नसल्याचे आढळूण आल्याने अशा कर्मचार्यांवर कारवाई करावी असे थेट आदेश शासनाने दिले आहेत. 

   या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या हेतूने सोलापूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी दिलेल्या आदेशानुसार आता 1 मे २०१९ पासून तलाठी,मंडल अधिकारी व ग्रामसेवकांनी कर्तव्याच्या ठिकानी निवासी राहणे बंधनकारक करण्यात आले आहे.मात्र यापुर्वीही असे आदेश अनेक वेळा जिल्हाधिकारी स्तरावरुन देण्यात आले होते.मात्र कोरोना काळात एकीकडे शासन घरीच रहा,सुरक्षित राहा असे आवाहन करत असताना ”माझे कार्यक्षेत्र माझी जबाबदारी” याचे भान ठेवून शासनाकडून प्राप्त होणाऱ्या घरभाडे भत्ता खिशात घालून देखील अनेक भाऊसाहेब प्रत्यक्षात कर्तव्याच्या ठिकाणी निवासी न राहता कागदोपत्री मेळ घालून गायब असतात अशीच तक्रार अनेक वेळा गावगाड्यातील शेतकरी,ग्रामस्थ व्यक्त करताना दिसून येतात.   

    नोकरीत दाखल होतानाच निवासी पदे असल्याने कर्तव्याच्या ठिकाणी निवासी रहावे लागेल या आदेशास कायदेशीर मार्गाने ठेंगा दाखविण्यासाठी काही भाऊसाहेब हे ज्या गावात नेमणूक आहे त्या गावातील एखाद्या ग्रामस्थाला हाताशी धरुन त्याच्याकडील एखाद्या खोलीचा शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर निवासी भाडेकरार करुन आपण कर्तव्याच्या ठिकाणी निवासी रहात असल्याचा देखावा करण्यात यशस्वी ठरत आले आहेत.आताही हाच बोगस भाडेकराराचा फंडा वापरला अनेक ठिकाणी वापरला जात असल्याची चर्चा आहे.असे बोगस भाडेकरार करण्यास सहकार्य करुन संपुर्ण गावास वेठीस धरण्यास तलाठी,मंडल अधिकारी व ग्रामसेवकास सहकार्य करणाऱ्या गावकऱ्याबाबत ग्रामस्थांनी जागरूक राहणे गरजेचे झाले आहे.तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी चांगल्या हेतूने दिलेल्या या आदेशाची अंमलबजावणी विद्यमान जिल्हाधिकारी करतील काय ? आणि सामान्य नागिरकांना तालुक्याला हेलपाटे मारण्यास कारणीभूत ठरत असलेल्या अशा काही कतर्व्य चुकार भाऊसाहेबांना शिस्त लागावी म्हणून लोकप्रतिनिधी पुढाकार घेतील काय असाच प्रश्न उपस्थित केला जात आहे.       

सोलापूर जिल्ह्यात महसूल प्रशासनाने नुकतीच प्रलंबित फेरफार नोंदीची मोहीम हाती घेतली होती.यात सोलापूर जिल्ह्यात रखडलेल्या हजारो फेरफार नोंदीची प्रकरणे मार्गी लागली.थेट वरिष्ठ पातळीवरून आदेश असल्याने अनेक गावातील अनेक ”मिळकतीच्या” नोंदी करून घेणे अनेक ठिकाणच्या भाऊसाहेबांना भाग पडले असल्याची खुमासदार चर्चा मात्र होत आहे.          

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *