ताज्याघडामोडी

महावितरणच्या गलथान कारभारामुळे लाखमोलाचा ऊस जळून खाक

जालना, 07 मार्च : जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील अंतरवाली टेम्भी गावात महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे काका आणि पुतण्याचा 3 एकर ऊस डोळ्या देखत जळून खाक झाला आहे. मेहनतीने उगवलेल्या पिकाची डोळ्यादेखत राखरांगोळी झाली आहे.

जगन्नाथ कळंब आणि रघुनाथ कळंब अशी या पीडित शेतकऱ्यांची नावे असून दोघांनी आपल्या वाट्याच्या दीड-दीड एकर शेतात उसाची लागवड केलेली होती. यंदा पावसाने साथ दिल्यामुळे दोन्ही शेतकऱ्यांनी संपूर्ण शेतात उसाची लागवड केली होती.

दरम्यान शनिवारी रात्री 8 च्या सुमारास शेतातून जात असलेल्या महावितरण कंपनीच्या हाय व्होल्टेज मेन लाईनचा जम्परिंग तुटून शॉटसर्किट झाले. शॉर्टसर्किटमुळे ऊसाच्या मळ्यात आग लागली. बघता बघता आगीने रौद्ररुपधारण केले. अवघ्या काही तासांत तीन एकर परिसरातला ऊस भक्षस्थानी सापडला.महावितरण कंपनीने सदरील मेन लाईनचे पोल तर बदलले होते मात्र वायर तसेच जुनाट ठेवले होते. जर पोलबरोबर वायर देखील बदलले असते तर ही दुर्घटना टळली असती, अशी माहिती पीडित शेतकऱ्यांनी दिली.दरम्यान, याच आठवड्यात विजेची तार तुटून साडेपाच एकर वरील ऊस जळून खाक झाला होता.

लातूर जिल्ह्यातील हटकरवाडी इथं हा प्रकार घडला होता.हटकरवाडी येथे विजेची तार तुटून शॉटसर्किट झालं. यामुळे उसाच्या पिकाला आग लागली. या आगीत साडेपाच एकरावरील उभा ऊस जळून गेला. यात सात शेतकऱ्यांचा ऊस जळाला होता. याची माहिती प्रशासनाला मिळताच तहसीलदार, तलाठी, मंडळ अधिकारी यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा करण्याची सूचना केली. पंचनामा करून तात्काळ अहवाल सादर करण्यास संदर्भातल्या सूचनाही देण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *