ताज्याघडामोडी

आमदाराच्या ड्रायव्हरकडे सापडली 1 कोटीची रोकड 

आयकर विभागाच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) अण्णाद्रमुकचे (AIADMK) आमदार आर. चंद्रशेखर यांच्या ड्रायव्हरच्या घरावर छापा टाकला आहे. या छापेमारीत तब्बल 1 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहे. आर. चंद्रशेखर या आमदाराच्या ड्रायव्हरकडे भली मोठी रक्कम सापडल्याने खळबळ उडाली आहे. आयकर विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. अलगरासामी असं या चालकाचं नाव असून त्यांच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम सापडल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. तामिळनाडूच्या त्रिची जिल्ह्यातील मनाप्पराई मतदार संघाचे चंद्रशेखर हे आमदार आहेत.

गेल्या 9 ते 10 वर्षांपासून अलगरासामी आर. चंद्रशेखर यांच्याबरोबर काम करतात. आता तिसऱ्यांदा त्यांची AIADMK चा उमेदवार म्हणून निवड करण्यात आली आहे. चंद्रशेखर यांच्या अन्य दोन साथीदारांच्या घरावरही छापेमारी करण्यात आली आहे. कोविलपट्टी गावातील थंगापंडी आणि मुरुगनंदम या दोघांच्या घरावर देखील छापेमारी करण्यात आली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, छापेमारीत तब्बल 1 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहे. 500 रुपयांच्या नोटांचे बंडलच्या बंडल सापडले आहेत.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रशेखर यांच्या घराजवळ असणाऱ्या निवासस्थानाजवळ रविवारी रात्री आयकर विभागाने ही छापेमारी केली होती. कोणतेही कागदपत्र किंवा आवश्यक माहितीशिवाय ठेवण्यात आलेले 1 कोटी रुपये यावेळी जप्त करण्यात आले. निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आल्यानंतर तामिळनाडुच्या विविध भागांतून मोठ्या प्रमाणात रक्कम जप्त केली जात आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *