ताज्याघडामोडी

स्वत:ला बाजीप्रभू देशपांडे म्हणवून घेणारे खिंड सोडून पळाले; विखे-पाटलांचा बाळासाहेब थोरातांना सणसणीत टोला

२०१९ साली काँग्रेस वाचविण्यासाठी मी बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका बजावणार, असे सांगणारे आणि एकाकी खिंड लढवणार म्हणवून मिरवून घेणारे आता हतबल का झाले ? खिंड लढवायची सोडून त्यांनी पळ काढण्यात समाधान मानले आहे, अशी उपरोधिक आणि घणाघाती टीका करीत राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी थोरातांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या राजीनामा नाट्यावर त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

नाशिक पदवीधर विधानपरिषद निवडणूक निकालानंतर राज्यात विविध राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. राज्यातील या घडामोडींबद्दल महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी माध्यमाशी संवाद साधला. तेव्हा ते म्हणाले की, नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ पक्ष नेते पक्षश्रेष्ठींकडे राजीनामा पाठविण्याची भाषा करतात. त्यांचे प्रदेशाध्यक्षांशी जमत नाही म्हणून सांगतात. या बऱ्याच गोष्टींचे आश्चर्य वाटते. नाशिक पदवीधर मतदारसंघात महविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार होता आणि काँग्रेस पक्ष हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे. पण काँग्रेसने महविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी का प्रयत्न केला नाही, हा मोठा प्रश्न सर्वांना पडला आहे. असे विखे पाटील म्हणाले.

काँग्रेसमध्ये देखील तुम्हाला कुणी विचारत नाही. तुम्ही देशातील अध्यक्षांकडे जाऊन भांडा किंवा महाराष्ट्राचे जे प्रभारी असतील त्यांच्याकडे जाऊन भांडा, परंतु पक्षाचा अंतर्गत वादाचा परिणाम महाविकास आघाडीवर झालेला आहे. त्याची जबाबदारी ते घेणार की नाही, हा महत्वाचा प्रश्न आहे, असे राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *