गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पोलीस शिपायाला १७ लाखांचा गंडा

मुंबई : स्वस्तात घर विकत घेण्याचे प्रलोभन दाखवून एका पोलीस शिपायाला १७ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. दिंडोशी येथील शिवशाही पुनर्वसन प्रकल्पांतर्गत उभारलेल्या इमारतीत दोन सदनिका प्रत्येकी दहा लाख रुपयांना खरेदी करण्याच्या मोहापोटी पैसे भरणाऱ्या या शिपायाला अशी कोणतीही इमारतच नसल्याचे समजल्यावर ही फसवणूक लक्षात आली.

कुर्ला परिसरात वास्तव्यास असलेल्या आणि सध्या पश्चिम उपनगरातील पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावणारा पोलीस शिपाई घराच्या शोधात होता. दोन वर्षांपूर्वी त्याची एका महिलेसोबत ओळख झाली. तिने दिंडोशी येथील एका इमारतीतील २२५ चौरस फु टांच्या दोन सदनिका या पोलीस शिपायाला दाखविल्या. ही इमारत शिवशाही पुनर्वसन प्रकल्पांतर्गत उभारण्यात आली असून या दोन सदनिका परिचित व्यक्तींना सोडतीत मिळाल्या आहेत. दोन्ही सदनिका २० लाख रुपयांत विकत घेता येतील, असे सांगत आरोपींनी तक्रारदार पोलीस शिपायाला काही एमएमआरडीएची कागदपत्रे दाखवली. त्यावर विश्वास ठेवून शिपायाने धनादेशांद्वारे ११ लाख ५० हजार रुपये दिले. तसेच सुमारे पाच लाख ७२ हजार रुपये रोख स्वरूपात आरोपींच्या हाती ठेवले. मात्र इतकी रक्कम देऊनही सदनिकांचा ताबा मिळत नसल्याने शिपायाने एमएमआरडीए कार्यालयात चौकशी के ली. तेव्हा अशा कोणत्याही योजनेतून सदर इमारत बांधण्यात आलेली नाही, एमएमआरडीएचा या इमारतीशी काहीही संबंध नाही, अशी माहिती पुढे आली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने पोलीस तक्रार केली. साकीनाका पोलीस महिलेचा शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *