गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

साखर कारखानदाराच्या घरावर भरदिवसा दरोडा

पोलिसांना खुले आव्हान देणारी घटना हापूडमध्ये घडली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमाक ९ वरील पोलीस ठाण्यापासून शंभर मीटरवर असलेल्या एका साखर कारखान्याच्या मालकाच्या घरात दिवसाढवळ्या सात दरोडेखोर घुसले. त्यांनी घरात घुसून सरपंच पत्नीला डांबून ठेवले. तिला मारहाण केली आणि घरातून लाखो रुपयांचे दागिने आणि रोकड घेऊन पसार झाले.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस प्रशासन हादरले. पोलीस अधीक्षकांसह पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी घटनेची माहिती घेतली. दरोडेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांची तीन पथके स्थापन करण्यात आली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सिंभावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत महेंद्र गोयल यांचे घर पोलीस ठाण्यापासून अवघ्या १०० मीटरवर आहे. त्यांचा साखर कारखाना आहे. त्यांची पत्नी कल्पना गोयल या भोवापूर मस्तान नगरच्या सरपंच आहेत. सोमवारी दुपारी महेंद्र गोयल काही कामानिमित्त घराबाहेर गेले होते. त्यांची पत्नी आणि अन्य एक महिला घरातच होती.

दुपारच्या वेळेस घरातील नोकर काही वस्तू घेऊन घरी आला. त्याच्या मागोमाग सात दरोडेखोर आले. ते घरात घुसले. त्यांनी बंदूक आणि चाकूचा धाक दाखवून कल्पना गोयल आणि त्यांचा नोकर देवराज आणि मोलकरीण अर्चना यांना डांबून ठेवले. घरातील सोन्याचांदीचे दागिने, रोकड आणि दोन महागडे मोबाइल घेऊन पोबारा केला.

नोकरांना बेदम मारहाण

लुटारूंनी घरातील तिजोरीत ठेवलेले दागिने आणि रोकड काढून देण्याची मागणी केली. मात्र, चावी नसल्याचे पत्नीने सांगितले. त्यावर लुटारूंनी महिलेसह तिच्या नोकरांना बेदम मारहाण केली. त्यानंतर महिलांनी जे सोन्याचे दागिने अंगावर घातले होते. ते लुटून पोबारा केला. या घटनेची माहिती मिळताच, पोलीस अधीक्षक दीपक भूकर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्वेश मिश्रा घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. लवकरच घटनेचा उलगडा करू, असे त्यांनी सांगितले. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने व्यापाऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *