मुंबई, 31 जानेवारी : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर बोरघाटात वाहतू कोंडीदरम्यान मार्ग काढण्यासाठी एका बहाद्दराने इतर वाहनचालकांना चक्क रिव्हॉल्व्हरची भीती दाखवली होती. या प्रकरणी अखेर दोघांना अटक करण्यात आली आहे. परंतु, पिस्तुल दाखवणारे हे शिवसैनिक नव्हते, चुकीच्या पद्धतीने शिवसेनेवर टीका करण्यात आली, असा खुलासा राज्याचे गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी केला आहे.
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवरील एक व्हिडीओ ट्वीट केला होता. यात एका कारमधील तरुण पिस्तुलीचा धाक दाखवून जात होते. गाडीवर शिवसेनेचा लोगो असल्यामुळे जलील यांनी शिवसेनेवर आरोप केला होता. परंतु, त्यांच्या या आरोपाला राज्याचे गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी उत्तर दिले आहे.मुंबई पुणे एक्स्प्रेसवर बोरघाटात वाहतुकोंडी असल्याने वाहतुकोंडीतून मार्ग काढण्यासाठी समोरील वाहनचालकांना रिव्हॉल्वरची भीती दाखवून त्यांच्या कारसाठी वाट काढत असल्याची घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली होती.
या प्रकरणात खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये एक कार चालक आणि त्याच्यासोबत असणारा एक व्यक्ती भर रस्त्यात वाहनांच्या गर्दीत रिव्हॉल्वरची भीती दाखवून त्यांच्या कारसाठी वाट काढताना दिसत आहे. खोपोली पोलिसांनी तातडीने तपास करीत कार नंबरच्या आधारे अटक करून कारमधील प्रवाशांना खोपोली पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे.