ताज्याघडामोडी

परिवहन विभागाकडून राज्यातील रूग्णवाहिकाचे दर निश्चित

प्रादेशिक परिवहन कार्यालयाने जिल्ह्यातील रुग्णवाहिकांसाठी वाहन प्रकारानुसार प्रवास भाडे निश्चित केले असून, यापुढे ५०० ते ९०० रुपये दर असेल. त्यात व्हॅन स्वरूपातील रुग्णवाहिकेसाठी दोन तासाला पाचशे रुपये दर असणार आहे. दरम्यान, करोना साथीच्या काळात रुग्णवाहिकांसाठी अवाजवी दर आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यामुळे आता या प्रकारांना आळा बसण्यास मदत होईल.

करोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिक आणि वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या संस्थांच्या अडचणी लक्षात घेऊन पुणे आरटीओ प्रशासनाने अ‍ॅम्बुलन्सचे दरपत्रक तयार केले आहे. हे दर ठरविताना दोन टप्पे करण्यात आले आहेत. त्यामध्ये २५ किलोमीटर अथवा दोन तासांसाठी निश्चित शुल्क असेल. २५ किलोमीटर पुढील अंतरासाठी प्रति किमी भाडे आकारले जाईल आणि वेटिंग कालावधीचे प्रति तास या प्रमाणे भाडे आकारले जाईल, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी दिली.

व्हॅन स्वरूपातील रुग्णवाहिकेसाठी ५०० रुपये आणि २५ किलोमीटरच्या पुढे अंतर गेल्यास मूळ भाड्यात प्रति किलोमीटर ११ रुपये दर आकारण्यात येणार आहे. तर, तासाला शंभर रुपये वेटिंगचा दर निश्चित करण्यात आला आहे. व्हॅनहून मोठ्या रुग्णवाहिकेसाठी ६०० रुपये आणि २५ किलोमीटर पुढील अंतरासाठी प्रति किलोमीटरला १२ रुपये द्यावे लागणार आहेत. या रुग्णवाहिकांना तासाला सव्वाशे रुपये वेटिंग दर आहे. तसेच, मिनी बससारख्या रुग्णवाहिकांसाठी ९०० रुपये आणि २५ किलोमीटर पुढील अंतरासाठी प्रति किलोमीटर १३ रुपये आणि तासाला १५० रुपये वेटिंग दर ठरविण्यात आला आहे.

हॉस्पिटल आणि रुग्णवाहिकेत दरपत्रक ठळकपणे लावले नसल्यास आरोग्य विभागाला कारवाई करण्याचे अधिकार आहेत. तसेच, निश्चित दरापेक्षा जास्त दर आकारल्यास हॉस्पिटल प्रशासनाने त्याची माहिती आरोग्य विभाग आणि आरटीओ प्रशासनाला देणे बंधनकारक आहे. हॉस्पिटल प्रशासनाने ही माहिती न दिल्यास त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आरटीओ प्रशासनाने स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *