Uncategorized

कल्याणराव काळे राष्ट्रवादीत प्रवेश करणार ?

          राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज स्व.भारत भालके यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनपर भेटीसाठी  सरकोली ता.पंढरपूर येथे आले असता त्यांनी भालके परिवाराची भेट घेऊन त्यांना धीर दिला.खा.शरद पवार यांच्या या भेटीमुळे पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील स्व.आ.भारत भालके समर्थकांना मोठा दिलासा मिळाला असून स्व.आ.भारतनाना ज्या पवार साहेबांना आपले दैवत मानत होते साक्षात तेच शरद पवार त्यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटूंबास धीर आणि आधार देण्यास आल्यामुळे या भारतनाना प्रेमींमध्ये मोठा उत्साह संचारला होता.यावेळी जनसमुदाया समोर बोलताना विठ्ठल परिवाराचे नेते म्हणून कल्याणराव काळे यांनी स्व.भारतनानांच्या आठवणी जागवताना आर्थिक संकटात सापडलेल्या या तालुक्यातील तिन्ही साखर कारखान्यांना  सरकारचे बळ मिळावे यासाठी केलेल्या पाठपुराव्याची आठवण जागवतानाच खा. शरद पवार यांनी केलेल्या मार्गदर्शन आणि सहकार्याचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला व यापुढे शरद पवार सांगतील त्या पद्दतीने काम करू असे सांगितले.त्यांच्या या विधानामुळे कल्याणराव काळे हे लवकरच भाजपा सोडून राष्ट्रवादी कॉग्रेस मध्ये प्रवेश करतील अशी चर्चा पंढरपूर तालुक्यात सुरु झाली आहे. 

    खा शरद पवार यांनी येथे बोलताना या तालुक्यातील तीनही साखर कारखान्याची आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे सांगितले.दोन महिन्यापूर्वी राज्य शासनाने साखर कारखान्यांना पूर्व हंगामी कर्जासाठी थकहमी देताना सहकार शिरोमणी साखर कारखान्यास राजकीय कारणामुळे थकहमी मिळण्यास अडचण येईल अशी शक्यता वर्तविली जात होती.आणि यासाठी जेष्ठ नेते शरद पवार यांचे पाठबळ मिळणे गरजेचे होते.शरद पवार हे ५ ऑकटोबर रोजी स्व.आ. भालके यांच्या पंढरपूर निवासस्थानी आले असता कल्याणराव काळे याना सुरक्षेसाठी तैनात अधिकाऱ्यांनी रोखले होते. त्यानंतर प्रतिक्रिया देताना स्व.आ.भारत भालके यांनी पक्षभेद बाजूला सारत वेगळ्या पक्षात असले तरी कल्याणराव काळे हे विठ्ठल परिवाराचे नेते आहेत असे ठणकावून सांगितले होते. आणि यानंतर मुंबई येथे स्व. भारतनाना आणि कल्याणराव काळे हे अनेकदा खा.शरद पवार यांना भेटले होते.  सहकार शिरोमणी साखर कारखान्यास राज्य शासनाची थकहमीही मिळाली होती.  
    कल्याणराव काळे हे जसे तालुक्यातील भाजपचे नेते आहेत तसेच ते सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन देखील आहेत.सहकारी साखर कारखानदारीवर अवलंबुन असलेले कामगार,संलग्न छोटे व्यवसायिक याच बरोबर ऊसउत्पादक सभासद आणि शेतकरी यांच्या हितासाठी साखर कारखाना सुरळीत चालवायचा असेल तर राज्यात सत्तेवर असलेल्या सरकारचे पाठबळ मिळविणे हि साखर कारखानदारांची आगतिकता ठरली आहे.आणि कदाचित याच आगतिकतेतून फडणवीस सरकारच्या काळात अनेक साखर कारखानदारांनी कमळ हाती घेतले होते.पण या पक्षीय पळापळी मागे खरे कारण हे कारखाना आहे हे समजून कल्याणराव काळे समर्थक सहकार शिरोमणी परिवार आणि विठ्ठल परिवार कल्याणराव काळे यांचा पक्ष कोणता हे बाजूला सारत त्यांना आपला नेता मानत आला आहे.स्व.आ. भारत भालके यांच्या निधनानंतर आता कल्याणराव काळे यांच्यावर मोठी जबाबदारी आली असून आता ते राष्ट्रवादीत प्रवेश करून स्व.भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांना पाठबळ देतील असा विश्वास पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील स्व.भारतनाना प्रेमी कार्यकतें,जनता आणि विठ्ठल परिवारातील बहुतांश कार्यकर्ते आजच्या त्यांच्या भाषणांनंतर व्यक्त करताना दिसून आले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *