ताज्याघडामोडी

रात्रभर ड्युटी, सकाळी कुटुंबासोबतचा नाश्ता ठरला अखेरचा, हेड कॉन्स्टेबलचा शोकाकुल अंत

रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड तालुक्यात कर्तव्य बजावत असताना पोलीस हेड कॉन्स्टेबलचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. संदीप गुजर यांचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ते ४८ वर्षांचे होते. संदीप गुजर यांनी तब्बल तेवीस वर्षे सेवा बजावली होती.

मंडणगड पोलीस ठाणे अंमलदार म्हणून त्यांनी रात्रभर ड्युटी केली होती. ड्युटी संपवून सकाळी ८ वाजताच्या सुमारास ते घरी आले. त्यांनी नाश्ता केला. त्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यांना तात्काळ घरच्या मंडळीनी श्रद्धा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी नेले, पण दुर्दैवाने तत्पूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.

वर्षभरापूर्वीच संदीप गुजर यांची मंडणगड पोलीस ठाण्यात बदली झाली होती. त्यांच्या अशा अचानक निधनाने अनेकांना धक्का बसला आहे. एक चांगला आणि मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व असलेला सहकारी निघून गेल्याची शोकाकुल प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे.

पोलीस हवालदार असलेले संदीप गुजर हे अत्यंत कर्तव्यनिष्ठ, सेवाभावी वृत्तीचे होते. संदीप गुजर हे मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील पालवणी येथील होते. मात्र त्यांनी अलिकडे खेड तालुक्यातील गुणदे आवाशी येथे आपल्या आजोळी त्यांनी नवीन वास्तू बांधली होती.

संदीप गुजर यांच्या पश्चात पश्चात पोलीस खात्यातून निवृत्त झालेल्या मातोश्री, मुंबई पोलीसमध्ये असलेले भाऊ, पोलीस खात्यात कार्यरत असलेल्या पत्नी साक्षी गुजर व मुलगा असा मोठा परिवार आहे. संदीप गुजर यांनी घेतलेली एक्झिट अनेकांना चटका लावणारी ठरली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *