ताज्याघडामोडी

खाद्य तेल स्वस्त होणार, केंद्राकडून आयात शुल्कात घट

वाढती महागाई आणि खाद्य तेलाच्या वाढत्या किंमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट पार कोलमडून गेलेय. यात सरकारने बऱ्याच उपाययोजना करुनही खाद्यतेलाचे दर कमी होण्याचे नाव घेत नाही. यामुळे केंद्र सरकाराने आता एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. केंद्राने खाद्य तेलावरील आयात शुल्कात मोठी घट केली आहे. यामुळे देशातील खाद्य तेलाच्या वाढत्या किंमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठी मदत होईल.

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या माहितीनुसार, सूर्यफुल तेलावरील आणि कच्चा सोया तेलावरील आयात शुल्क घटवत ते आता साडेसात टक्के करण्यात आलं आहे. मात्र हा निर्णय मर्यादित काळासाठी लागू हेणार असून या निर्णयाची अंमलबजावणी ३० सप्टेंबरपर्यंत चालू राहणार आहे. आगामी काळात देशातील गणेशोत्सव, नवरात्री, दिवाळी अशा अनेक सण-समारंभांमुळे खाद्य तेलाच्या मागणीत मोठ्याप्रमाणात वाढ होते. या काळात देशातील खाद्यतेलाचे दर कमी असावेत याकरिता केंद्राने मर्यादित काळासाठी हा निर्णय घेतला आहे. अशी माहिती केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळाने दिली आहे.

भारतात खाद्यतेलाची मागणी सर्वाधिक असली तरी उत्पादन कमी आहे. त्यामुळे खाद्य तेलासाठी भारतात इतर देशांवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे देशातील खाद्य तेलाचे उत्पादन वाढवण्यासाठी भारत सरकार बरेच प्रयत्न करत आहे. तसेच आगामी काळातही खाद्यतेलाचे उत्पादन वाढवण्यासाठी तेल मिशन योजना सुरु केली आहे. २१ कोटींची गुंतवणूक केल्या या योजनेअंतर्गत देशात खाद्यतेलाचे उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *