ताज्याघडामोडी

दिलीप वळसे-पाटील अचानक ‘वर्षा’वर

केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आल्यानंतर भाजपमधून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.राज्यात अनेक ठिकाणी शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्ते समोरासमोर भिडल्याने राज्यातील काही भागात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे गृहमंत्र्यांपाठोपाठ युवा सेनेचे पदाधिकारीही वर्षावर आल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे.

शिवसैनिक आणि भाजपची सकाळी झालेलाी आंदोलने आणि दुपारी नारायण राणे यांना झालेली अटक त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. या अटक नाट्यानंतर शिवसेना आणि भाजप नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आज मीडियाशी बोलणार होते. त्यांची पत्रकार परिषद होणार होती. मात्र, ऐनवेळी ही पत्रकार परिषद रद्द झाली. दिलीप वळसे-पाटील अचानक वर्षावर पोहोचले आहेत. आज झालेल्या एकूण राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वळसे-पाटील यांना बोलावून घेतल्याचं सांगितलं जात आहे. यावेळी पोलीस महासंचालकही उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं जात आहे.

राणे प्रकरणावर चर्चा होणार?

राणेंची अटक, कायदेशीरबाबी आणि राज्यातील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती यावर या बैठकीत चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. राणेंच्या अटकेमुळे कोकणात त्याचे सर्वाधिक पडसाद उमटू शकण्याची शक्यता असल्याने कोकणात पोलीस बंदोबस्त वाढवण्यावर चर्चा होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. दरम्यान, या बैठकीनंतर वळसे-पाटील हे मीडियाशी बोलण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

मुख्यमंत्री, गृहमंत्री, युवा सेना पदाधिकाऱ्यांची बैठक?

दरम्यान, वळसे-पाटील वर्षा निवासस्थानी पोहोचून 10 मिनिटे होत नाही तोच युवा सेनेचे पदाधिकारी राहुल कनाल, समाधान सरवणकर आणि साईनाथ दुर्गे हजर झाले. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्री आजच्या आंदोलनाची माहिती घेण्याची शक्यता आहे. मात्र, मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि युवा सेना पदाधिकारी यांचीही एकत्रित बैठक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, या वृत्ताला अद्याप कोणीही दुजोरा दिलेला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *