मुसळधार पाऊस, महापूर आणि दरड कोसळून झालेल्या दुर्घटनांमध्ये कोकणातील चिपळूण, खेड, महाड तालुक्यात कधीही न भरुन येणारं नुकसान झालं आहे. याच नुकसानाची पाहणी करण्यासाठी नेतेमंडळींचे दौरे सुरु आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही चिपळूणमधील पूरस्थिती आणि झालेल्या नुकसानाची पाहणी केली. त्यावेळी बोलताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली होती. राणे यांच्या टीकेला शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
अशात राजकारण करायला नको. राज्यावर आलेल्या संकटाबाबत नारायण राणे यांनी मुख्यमंत्री हे पांढऱ्या पायाचे असल्याने राज्यावर संकट आल्याचे वक्तव्य केलं. मात्र, राणे हे केंद्रीय मंत्री झाले आणि कोकणावर संकट आलं. म्हणजे राणेच पांढऱ्या पायाचे आहेत, अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केलीय. ते जळगावात बोलत होते. संकटात सापडलेल्या व्यक्तीला सर्वतोपरी मदत करायला हवी. माणसाने माणसाला मदत करण्यासाठी एकत्र यायला हवं. राजकारण करायला खुप आखाडे आहेत. जेव्हा वेळ असते तेव्हा तुमचा झेंडा घेवून तुम्ही उतरा, आमचा झेंडा घेवून आम्ही आखाड्यात उतरु. मात्र, राज्य संकटात असताना राजकारण करणे योग्य नसल्याचंही गुलाबराव पाटील म्हणाले.
नारायण राणे काय म्हणाले होते?
केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी रविवारी तळीयेमध्ये येऊन दुर्घटनेची पाहणी केली. यावेळी त्यांनी दुर्घटनाग्रस्तांची विचारपूस करून त्यांचे सांत्वन केले. तसेच अधिकाऱ्यांकडून घटनेची माहिती घेतली. ही घटना घडल्यानंतर राज्य सरकारशी तुमचं काही बोलणं झालं का? असा सवाल राणेंना यावेळी करण्यात आला. त्यावर उत्तर देताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर त्यांचं नाव न घेता टीका केली. कुठलं सरकार? महाराष्ट्र सरकारचे लोकं भेटत नाहीत, बोलत नाहीत. आता कुठे डिस्चार्ज झालाय घरातून आता फिरत आहेत, अशी टीका राणे यांनी केली.
आरोप करणं योग्य नाही
कोकणात वारंवार पूरस्थिती होती. त्यामुळे या ठिकाणी कायमस्वरुपी एनडीआरएफची तुकडी ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल, असं ते म्हणाले. या घटनेची कुणालाही कल्पना नव्हती. असं काही घडेल असं वाटलं नव्हतं. डोंगराची माती खाली येईल किंवा डोंगराचा कडा कोसळेल असं कुणाला वाटलं नव्हतं. त्यामुळे या घटनेवरून कुणावर आरोप करणं योग्य नाही. आज या दुर्घटनाग्रस्तांचं पुनर्वसन करणं महत्त्वाचं आहे, असंही राणे म्हणाले.