ताज्याघडामोडी

१ जूनपासून सर्व प्रकारचा व्यापार सुरू झालाच पाहिजे ! व्यापारी संघटनांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई | राज्यातील कोरोनासंदर्भातील सरकारने जाहीर केले निर्बंध १ जून रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे याच दिवसापासून सर्वच व्यापार पूर्ण वेळ सुरू करण्यासाठी परवानगी मिळालीच पाहीजे अशी आग्रही मागणी ‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ चे राष्ट्रीय संगठन मंत्री व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे वरीष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

नाहीतर आपल्या राज्यातील व्यापार शेजारच्या राज्यात जातील !

महाराष्ट्राच्या शेजारील विविध राज्यांत सर्व प्रकारचे व्यापार सुरू आहेत. त्यामुळे फक्त आपल्या राज्यातील व्यापार बंद राहिल्यास आपल्याकडचे व्यापार शेजारील राज्यात जाण्याची भिती आहे.

तसेच हे नुकसान कधीही भरून निघणार नाही. त्यामुळे आता १ जूनपासून कोणत्याही परिस्थितीत व्यापार सुरू करायचाच अशी व्यापार्‍यांची आग्रही भूमिका असल्याने सरकारने आता दुकाने सुरू करण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणीही करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना याबाबत पाठविलेल्या निवेदनाद्वारे ही मागणी करण्यात आली आहे. ‘२ महिन्यांच्या बंद कालावधीतील महापालिका, नगरपालिकांच्या अधिकार क्षेत्रातील दुकानांचे भाडे माफ करणे, वेगवेगळ्या प्रकारच्या परवाना फी मध्ये एक वर्षाची माफी द्यावी, प्रॉपर्टी टॅक्स, वीज बिल व कर्जावरील व्याज माफी यांचा समावेश असलेले विशेष पॅकेज व्यापार्‍यांसाठी जाहीर करावे’, अशी मागणी यामार्फत केल्याची माहिती ललित गांधी यांनी दिली आहे.

व्यापारी व कर्मचार्‍यांसाठी लसीकरणासाठी विशेष व्यवस्था करा !

राज्यातील कोरोनाचा संसर्ग प्रमाण नियंत्रणात आला असून १ जूननंतर राज्यातील रेडझोनमधील जिल्ह्यांसह सर्वच जिल्ह्यातील व्यापार सुरू झाला पाहिजे अशी विशेष मागणी व्यापारी वर्गाकडून करण्यात आली आहे. तसेच व्यापारी व कर्मचार्‍यांसाठी लसीकरणासाठी विशेष व्यवस्था करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

‘राज्यातील बहुतांश दुकानदारांनी लसीकरण करून घेतले असून उर्वरीत व्यापार्‍यांनी ही लवकरात लवकर स्वतःचे व कर्मचार्‍यांचे लसीकरण करून घ्यावे’ असे आवाहनही ‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स व महाराष्ट्र चेंबर’तर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *