शेतीचा फेरफार नोंदीसाठी 5 हजार रुपयांची लाच मागितल्याची घटना कालगाव येथे घडली आहे. याप्रकरणी तलाठी अनंदा नारायण गायकवाड यांच्याविरुध्द लाच लुचपत प्रतिबंधक खात्याने आज 26 जुलै रोजी कारवाई केली.
एका तक्रारदाराने 8 जुलै रोजी समक्ष एक तक्रार दाखल करीत विकत घेतलेल्या शेतीचा फेर लावून देण्यासाठी संबंधित तलाठी अनंदा गायकवाड यांनी पाच हजार रुपयांची मागणी केल्याचे नमूद केले. या विभागाच्या पथकाने 9 जुलै रोजी पंचासमक्ष केलेल्या कारवाईत संबंधित तलाठ्याने 5 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. पाठोपाठ येथील चुडावा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करीत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.
पोलीस अधिक्षक कल्पना बारवकर, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, पोलिस उपअधिक्षक भरत हुंबे, पोलिस निरीक्षक राजेश पुरी, हनुमंते, कटारे, कुलकर्णी, धबडगे, चट्टे, शेख मुखीत, शेख मुख्तार, चौधरी, कदम यांच्या पथकाने ही कारवाई केली.