ताज्याघडामोडी

मानाच्या सात पालखी सोहळा प्रमुखांसोबत आषाढी सोहळ्याबाबत उद्या अजित पवार विशेष बैठक घेणार

पुणे – करोनाच्या संकटामुळे मागील वर्षी आषाढी पायी वारी पालखी सोहळ्यास परवानगी देण्यात आली नव्हती. त्याऐवजी एसटी बसने पालखी पंढरपूरला नेण्यात आल्या होत्या. यंदा मात्र पायी पालखी सोहळ्यासाठी वारकरी संप्रदाय आग्रही आहे.वारकरी संप्रदायाने यंदा मर्यादित स्वरूपात, करोनाचे सर्व नियम पाळून वारकऱ्यांना पायी पालखी सोहळ्यासाठी परवानगी द्यावी, अशी भूमिका वारकरी संप्रदायाने घेतली आहे. पंढरपूर येथे प्रातांधिकारी यांच्यासोबत वारकरी संप्रदायाची बैठक घेतली. त्यावेळी ही भूमिका मांडण्यात आली आहे.

दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि.28) विधानभवन येथे देहू, आळंदीसह मानाच्या सात पालखी सोहळा प्रमुखांची बैठक होणार आहे.आषाढी वारी संदर्भात चर्चा होणार असून वारकऱ्यांचे म्हणने शासन दरबारी पोहोचणार आहे.
यंदा दि.20 जुलै रोजी आषाढी एकादशी असून दि.1 जुलै रोजी श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा तर दि.2 जुलै रोजी श्री संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याचे प्रस्थान आहे. मात्र, अजूनही राज्यातील अनेक जिल्ह्यात करोना बाधितांची मोठी संख्या आहे.

अशा परिस्थितीत सोलापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यात देखील करोनाची साथ असल्याने यंदा आषाढी यात्रा कशी घ्यायची हा प्रश्‍न सरकारपुढे आहे. मोजक्‍या वारकऱ्यांना पायी वारीस परवानगी द्यावी, करोना चाचणी करण्यात यावी, तसेच सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांचे लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी वारकऱ्यांनी केली आहे.
‘महाराष्ट्रावर करोनाचे संकट आहेच, जास्त भाविक एकत्र आले तर त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. मात्र, शासनाने योग्य नियोजन करून, मोजक्या वारकऱ्यांना पायी वारीसाठी परवानगी द्यावी. त्यांचे लसीकरण करण्यात यावे. प्रत्येक दिंडीतील किमान 2 वारकऱ्यांसह पायी पालखीं सोहोळ्यास परवानगी द्यावी.’ – ह.भ.प. पंडित महाराज क्षीरसागर (दिंडीप्रमुख, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा, दिंडी क्र. 147)

(मानाचे ७ पालखी सोहळे असून शासनाने वाढवलेले २ असे एकूण ९ पालखी सोहळे वेळापत्रक)

१) संत तुकाराम महाराज पालखी सोहळा १ जुलै २०२१

२) संत एकनाथ महाराज पालखी सोहळा १ जुलै २०२१

३) संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा, २ जुलै २०२१

४) संत सोपानकाका पालखी सोहळा, ६ जुलै २०२१

५) संत चांगावटेश्वर पालखी सोहळा, ६ जुलै २०२१

६) संत नामदेव महाराज पालखी सोहळा १९ जुलै २०२१

७) रुक्मिणी देवी पालखी सोहळा, १४ जून २०२१

८) आदिशक्ती संत मुक्ताबाई पालखी सोहळा , १४ जून २०२१

९) श्री क्षेत्र श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा २४ जून २०२१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *