गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

सख्खा भाऊ पक्का वैरी, प्रॉपर्टीच्या वादातून आईला शिवीगाळ, भावाच्या डोक्यावर लोखंडी रॉड घालुन केली हत्या

उल्हासनगरात मन पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. मालमत्तेच्या वादातून सख्ख्या भावाने भावाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मारेकरी भावाला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सख्खा भाऊ संपत्तीच्या वादातून इतक्या टोकाचा निर्णय कसा घेऊन शकतो? असा प्रश्न परिसरातील नागरिकांना सतावत आहे.

नेमकं काय घडलं?

संतोष कदम असं या घटनेतील मारेकरी भावाचं, तर विठ्ठल कदम असं मृत्यू झालेल्या भावाचं नाव आहे.या दोघांच्या आईचं उल्हासनगरमध्ये घर आहे. या घराच्या वाटणीवरून संतोष आणि त्याच्या आईमध्ये वाद झाला. यावेळी संतोष हा दारू पिऊन आईला शिवीगाळ करत असल्याने तिने विठ्ठल या आपल्या दुसऱ्या मुलाला घरी बोलावून घेतलं.

आधी धमकी, नंतर हत्या

मात्र विठ्ठल तिथे येताच संतोष याचा पारा आणखी चढला. त्याने हे घर माझं असल्याचं सांगत विठ्ठलला तिथून निघून जायला सांगितलं. मात्र विठ्ठल याने संतोषला तिथून पिटाळून लावलं. त्यामुळे संतोषने विठ्ठलला बघून घेण्याची धमकी दिली. यानंतर काही वेळातच विठ्ठल हा कॅम्प 1 भागातील भीमनगर परिसरात उभा असताना संतोष याने तिथे येत लोखंडी रॉडने विठ्ठलवर हल्ला केला. या हल्ल्यात विठ्ठल याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

पोलिसांकडून आरोपीला बेड्या

या घटनेनंतर पोलिसांनी काही वेळातच संतोष याला बेड्या ठोकल्या. पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष गोरे करतायत. मात्र या प्रकरणात पोलिसांनी प्रतिक्रिया द्यायला नकार दिलाय. या प्रकरणावर डीसीपी प्रशांत मोहिते यांनी प्रतिक्रिया दिली.

पोलिसांची प्रतिक्रिया

“उल्हासनगर पोलीस ठाणे हद्दीत भीमनगर येथे आरोपी संतोष कदम याने काल रात्री स्वत:च्या भावावर लोखंडी रॉड टाकून हत्या केली. संबंधित घटना रात्री अकराच्या सुमारास घडली. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना जेव्हा या घटनेची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आरोपीला पकडण्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आलं. घटनेनंतर अवघ्या काही तासात आरोपीला भिवंडी येथून पकडण्यात आलं”, असं डीसीपी प्रशांत मोहिते यांनी सांगितलं.

“आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. प्राथमिक माहितीनुसार, दोन भावांमध्ये घराच्या वाटणीवरुन वाद होता. या वादतूनच आरोपी आईला मारहाण करायचा. याच वादातून आरोपीने भावाची हत्या केली”, असं प्रशांत मोहिते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *