ताज्याघडामोडी

‘एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री’?

मुंबई पाठोपाठ ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचा मोठा चाहतावर्ग ठाण्यात आहे. आनंद दिघे यांनी हयात असताना ठाण्यासाठी जे काम केलं त्यामुळे पूर्ण ठाण्यात शिवसेनेचा बोलबोला होता.

आनंद दिघे आज हयात नाहीत. पण त्यांचा वारसा शिवसेनेचे नेते आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे पुढे चालवत आहेत. ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची सत्ता आहे. याशिवाय ठाण्यात गेल्या काही वर्षांमध्ये उड्डाणपूल, रस्त्यांपासून अनेक चांगल्या सुविधा झाल्या आहेत. त्यामुळे असंख्य ठाणेकर आणि शिवैसिकांचा शिंदेना पाठिंबा आहे. हे सगळं खरं असलं तरी ठाण्यात आज वेगळीच चर्चा सुरु आहे.

ठाण्यात शिवसैनिकांकडून लावण्यात आलेल्या बॅनरवर एकनाथ शिंदे यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री असताना अशाप्रकारची बॅनरबाजी होत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

 

शिवसैनिकांच्या शिंदे पिता-पुत्रांना अनोख्या शुभेच्छा

ठाण्यातील वागळे इस्टेट भागात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केलेले बॅनर लावले आहेत. येत्या 9 फेब्रुवारी रोजी मंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस आहे. तर श्रीकांत शिंदे यांचा 4 फेब्रुवारी रोजी वाढदिवस झाला.

दोघा पिता-पुत्रांना बॅनरच्या माध्यमातून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. या बॅनरवर एकनाथ शिंदे यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे. वागळे इस्टेट लॉरी असोसिएशनचे अध्यक्ष विजय यादव यांनी हे बॅनर लावल्याची माहिती समोर आली आहे. 

दरम्यान, संबंधित बॅनरबाजीवर शिवसैनिकांनी प्रतिक्रिया दिली. “आमचं एकनाथ शिंदेंवर प्रेम आहे. गेल्या 22 वर्षांपासून आम्ही त्यांच्यासोबत काम करत आहोत. महाराष्ट्रात आज कुठेही पूर, कोविड असं कोणतंही संकट असू द्या, एकनाथ शिंदे स्वत: लक्ष देवून जनतेसाठी काम करत आहेत.

अशा माणसाने महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावं, अशी प्रत्येक शिवसैनिकाची इच्छा आहे. त्यांनी मुख्यमंत्री म्हणून काम करावं”, असं शिवसैनिक म्हणाले.

“आमचं दिव्य स्वप्न आहे. जसं शिवसेना आणि भाजपच्या युतीचं सरकार असताना नारायण राणे सहा महिन्यांसाठी मुख्यमंत्री झाले होते अगदी तसंच एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळावं, अशी आमची इच्छा आहे. आम्ही लहानपणापासून ठाण्याचे शिवसैनिक आहोत.

शिंदे 24 तासांपैकी फक्त 4 तास झोपतात. ते 20 तास काम करतात. त्यांनी मुख्यमंत्री होऊन महाराष्ट्राच्या जनतेला द्यावं”, अशा भावना शिवसैनिकांनी व्यक्त केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *