ताज्याघडामोडी

ऑक्सिजन टॅंकरवरून कोल्हापूर-सातारा जिल्हाधिकाऱ्यांत तब्बल चार तास खडाजंगी!

कोल्हापूर: राज्यात सर्वत्र ऑक्सिजनचा तुटवडा भासत असताना सातारा येथे आलेला ऑक्‍सिजनचा टॅंकर कोल्हापूरसाठी कि सातारासाठी यावरून बराच वाद झाला. चार तास दोन जिल्हाधिकाऱ्यांच्या वादावादीनंतर अखेर हा टॅंकर सातारा येथेच नेण्यात आला आणि सातारा जिल्हा रुग्णालयात तो खाली करण्यात आला.

सध्या राज्यात अनेक जिल्ह्यात ऑक्सिजनची मोठी टंचाई आहे त्यामुळे प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी मागणी केल्याप्रमाणे ऑक्‍सिजनचा टँकर दिला जात आहे. आज दुपारी सातारा जिल्ह्यासाठी आलेला ऑक्‍सिजनचा टँकर पोलिस बंदोबस्तात पुण्याहून आणण्यात आला. पण हा टँकर कोल्हापूर जिल्ह्यासाठी असल्याचे सांगून चालक कोल्हापूर कडे घेऊन निघाला होता.

दुपारी चार वाजण्याच्या सुमारास वाढे फाटा या ठिकाणी सातारा पोलिसांनी हा टँकर अडवला. मात्र टँकर चालकाने आम्हाला हा टँकर कोल्हापूरला घेऊन जाण्याच्या सूचना दिल्याचे सांगितले. त्यामुळे हा टँकर नेमका कोणाचा याबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला होता.

शेवटी पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क केला त्यानंतर साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह व कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यात ऑक्सीजन टँकर वरून जुंपली. यावेळी दोघांनाही आपली ताकद लावली सुमारे तीन तासांहून अधिक हा टँकर त्या ठिकाणी थांबून राहिला अखेर हा टँकर सातारा येथेच उतरविण्याचा निर्णय झाला सायंकाळी सात वाजता हा टँकर पोलीस बंदोबस्तात साताऱ्यातील जिल्हा रुग्णालय व जंबो हॉस्पिटलमध्ये खाली करून घेण्यात आला. या टँकरमध्ये पंधरा मेट्रिक टन ऑक्सीजन होता.

ऑक्सिजन टँकर वरून कोणताही वाद होण्याचा प्रश्न नाही, कोल्हापूर ऑक्सिजन ही मोठी खाजगी ऑक्सिजन सप्लाय कंपनी आहे. ती अनेक जिल्ह्याला ऑक्सिजन पुरवते.. हा ऑक्सिजन सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयासाठी आलेला आहे.

– जिल्हा माहिती अधिकारी, सातारा

कोल्हापूर साठी स्वतंत्र टँकर

संबधित टँकरचा कोल्हापूर जिल्हा प्रशासनाशी काही संबध नाही. तो टँकर कोल्हापुरातल्या प्रायव्हेट उत्पादकाचा आहे. त्यातील ऑक्सिजन कोल्हापूर जिल्ह्यासाठी नाही. कोल्हापूर जिल्ह्यासाठी TNS या कंपनीकडून स्वतंत्र टँकर येत आहे. अशी माहिती कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *