ताज्याघडामोडी

केंद्र सरकारचा निर्णय ! देशातील 80 कोटी जनतेला मे, जूनमध्ये मोफत अन्नधान्य

नवी दिल्ली – केंद्र सरकारने पुढील दोन महिने (मे आणि जून) देशातील गरीब आणि गरजूंना 5 किलो मोफत अन्नधान्य पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा लाभ देशातील 80 कोटी जनतेला होणार आहे.
करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील स्थिती पुन्हा चिंताजनक बनली आहे. त्यातून करोना फैलाव रोखण्यासाठी बहुतांश राज्यांत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे गरीब, गरजूंना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत. ती बाब ध्यानात घेऊन सरकारने दिलासादायक पाऊल उचलले आहे.

करोना संकटामुळे मागील वर्षी तीन महिन्यांसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना जाहीर करण्यात आली. त्या योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबाला दरमहा अतिरिक्त 5 किलो गहू आणि तांदूळ तसेच 1 किलो डाळ उपलब्ध करण्यात आली.

त्या योजनेची मुदत नंतर मागील वर्षाच्या नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली. आता त्या योजनेंतर्गत पुन्हा मोफत अन्नधान्य वाटप होणार आहे. अर्थात, यावेळच्या वाटपात डाळीचा समावेश नसेल. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत येणाऱ्या लाभार्थींना नव्या निर्णयाने दिलासा मिळू शकेल. त्या कायद्यांतर्गत दरमहा मिळणाऱ्या अन्नधान्यांपेक्षा अतिरिक्त अन्नधान्य दोन महिने लाभार्थींना मिळेल. त्यासाठी 80 लाख टन अन्नधान्याची उपलब्धता करावी लागणार आहे. त्यासाठी सरकारी तिजोरीवर 26 हजार कोटी रुपयांचा आर्थिक भार पडेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *