गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

धक्कादायक, पोलीस कर्मचारीच निघाला बनावट क्रीडा प्रमाणपत्र घोटाळ्यातला आरोपी!

नागपूर, 05 मार्च : बनावट क्रीडा प्रमाणपत्र प्रकरणी नागपूरच्या मानकापूर पोलिसांनी महाराष्ट्र आईस हॉकी संघटनेच्या सचिवाला अटक केली. प्रशांत चव्हाण असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. धक्कादायक म्हणजे, तो ठाणे शहर मुख्यालयात पोलिसात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होता.

या प्रकरणाच्या तपासादरम्यान प्रशांत चव्हाणनं नागपूर विभागात तीन जणांना आईस हॉकी राष्ट्रीय स्पर्धेचं बनावट क्रीडा प्रमाणपत्र दिलं असल्याचं समोर आलं. त्यानंतर नागपूर पोलिसांनी त्याला ठाणे येथून ताब्यात घेतलं. त्याने आतापर्यंत 103 जणांना प्रमाणपत्र पडताळणी करून दिले असून त्यात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला आहे.

बनावट क्रीडा प्रमाणपत्र प्रकरणी आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या 12 आरोपींपैकी नागपूर, भंडारा, सांगली, औरंगाबाद, नगर, बीड, परभणी, नांदेड आणि आता ठाणे येथील आहे. या प्रकरणात आतापर्यंत आणखी काही लोकांना अटक होण्याची शक्यता आहे. बोगस क्रीडा प्रमाणपत्र घोटाळ्यातील मुख्य सूत्रधारास अंकुश राठोड आणि भाऊसाहेब बांगर औरंगाबाद येथून अटक करण्यात आली होती. ही कारवाई देखील मानकापूर पोलिसांनी केली होती. त्याच्यासोबत त्याच्या साथीदारालाही अटक करण्यात आली. त्याच्या घरून पोलिसांनी स्टीकर लागलेल्या दोन लक्झरी कारही सापडली होती.

बोगस क्रीडा प्रमाणपत्र बनवून लोकांना क्रीडा कोट्यातून शासकीय नोकरी लावून देणाऱ्या टोळीचा भंडाफोड झाला असून अटक सत्र सुरूच आहे. पोलिसांनी या प्रकरणात उपसंचालक अविनाश पुंड यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून तपास सुरू आहे. या घोटाळा प्रकरणात 14 ऑक्टोबर 2020 रोजी सेवानिवृत्त क्रीडा उपसंचालक सूभाष रेवतकर व क्रीडा अधिकारी महेश पडोळे यांना अटक करण्यात आली आहे. रेवतकर यांच्या घरून महाराष्ट्र शासन लिहिलेली खासगी कार व लाल दिवे सापडल्याने खळबळ उडाली होती. त्यांच्याकडूनच औरंगाबाद येथील रहिवासी अंकुश राठोड व भाऊसाहेब बांगर यात सहभागी असल्याची माहिती मिळाली.

मानकापूर पोलीस ठाण्यातील तपास अधिकारी कृष्णा शिंदे यांनी संतोष राठोड, राजेश वरठी, रघुजी चिनघर, मिलिंद नासरे, आणि हितेश फरकुंडे यांच्या मदतीने दोघांच्या घरी धाड टाकल्या होत्या. आतापर्यंत नागपूर पोलिसांनी क्रीडा प्रमाणपत्र घोटाळा प्रकरणी 12 जणांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *