ताज्याघडामोडी

पूर,अतिवृष्टी बाधितांना पंढरपूर तहसील कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या समन्वयाच्या अभावाचा फटका ? 

२२ कोटींच्या मदतीचे वाटप रखडले 

ऑक्टोबर २०२० मध्ये पंढरपूर तालुक्यातील जनतेला अतिवृष्टी आणि महापुराचा दुहेरी फटका बसला होता.यामध्ये पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्याच्या हजारो हेक्टर क्षेत्रातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.तर नदीकाठच्या पंढरपूर शहरासह अनेक गावांना पुराचा मोठा फटका सहन करावा लागला होता.आधीच कोरोनामुळे मोठे नुकसान सहन केलेल्या शेतकरी वर्गाचे कंबरडे मोडले होते तर पंढरपूर शहरातील व नदीकाठावरील अनेक घरे व्यवसाय पाण्याखाली गेल्याने प्रचंड आर्थिक नुकसान झाले होते.या नुकसान ग्रस्तांना राज्य शासनाकडून आलेल्या मदतीचे वाटप पंढरपूर तहसील कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यातील समन्वयाच्या अभावाने रखडले आहे काय ? असा प्रश्न आज विधपरिषदेत आमदार प्रशांत परिचारक यांनी उपस्थित केला असून तातडीने या उर्वरित रकमेचे वाटप व्हावे अशी मागणी केली.  

या प्रश्नास मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिलेल्या उत्तरानुसार शासनाने मदतीसाठी पहिल्या टप्यात ५८ कोटी ८० लाख तर दुसऱ्या टप्प्यात ४८ कोटी ९६ लाख इतकी रक्कम वर्ग केली आहे.त्यापैकी पहिल्या टप्प्यातील ४८ कोटी ५० लाख तर दुसऱ्या टप्प्यातील ३६ कोटी ९७ लाख मदतीचे वाटप बाधितांना करण्यात आले आहे.उर्वरित दोन्ही टप्यातील निधी मिळून देखील अद्याप पर्यंत जवळपास २२ कोटी रुपये वाटपा अभावी पडून असल्याचे ना.वडेट्टीवार यांनी दिलेल्या उत्तरातून स्पष्ट होत आहे.  पूर अतिवृष्टी बाधितांना पंढरपूर तहसील कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या समन्वयाचा फटका सहन करावा लागला आहे काय या आ.परिचारक यांच्या प्रश्नाबाबत मात्र त्यांनी क्षेत्रीय स्तरावर वाटपाचे काम सुरु आहे एवढेच उत्तर दिले.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *