संतांनी आपल्या अभंगातून ज्या चंद्रभागेचा बहीण म्हणून उल्लेख केला,ज्या चंद्रभागेचे जल भाविक तीर्थ म्हणून पंढरीच्या वारीस आल्यानंतर प्राशन करतात तर संपूर्ण पंढरपूर शहराचा पाणी पुरवठा या नदीवर अवलंबुन आहे त्या चंद्रभागा नदीमध्ये पंढरपूर तालुक्यातील वाखरी,गुरसाळे,शिरढोण,शेगाव दुमाला आणि गोपाळपूर या गावाच्या हद्दीतून सांडपाणी चंद्रभागेत मिसळले जात असल्याने नदीची प्रदूषण पातळी वाढल्याचे जानेवारी २०२१ मध्ये उघडकीस आले हि बाब खरी आहे का असा प्रश्न आमदार प्रशांत परिचारक यांनी विधानपरिषदेत उपस्थित केला असता मंत्री गुलाबराव पाटील यांनी हि बाब अंशतः खरी असल्याचे कबूल केले आहे.
या प्रश्नास उत्तर देताना ना. गुलाबराव पाटील यांनी या बाबत उपायोजना केली जात असल्याचे नमूद करत १४ व्या वित्तआयोगातून वाखरी येथे संतुलन टाकीचे,शेगाव दुमाला व गुरसाळे येथे स्थिरीकरण हौदाचे काम प्रस्तावित असल्याचे तर शिरढोण येथील सांडपाणी शोष खड्यात सोडले जात असल्याचे नमूद केले.गोपाळपूर येथून चंद्रभागेत मिसळणाऱ्या सांडपाण्याचे प्रमाण अल्प असून या ग्रामपंचायतीकडे प्रक्रियेसाठी जागेची उपलब्धता नसल्याने पर्यायी उपायोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे आपल्या उत्तरात नमूद केले आहे.
महायुतीच्या सत्ताकाळात चंद्रभागा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी उपायोजना करण्याच्या हेतूने नमामि चंद्रभागे योजना हाती घेण्यात आली होती.या योजनेच्या पहिल्या टप्यात पंढरपूर शहरातील यमाई ट्रॅक परिसरात तुळशी वृंदावनाच्या उभारणीचे काम हाती घेण्यात आले आणि एक वर्षाच्या आत ते पूर्णत्वास आले.या योजनेचा पुढील टप्पा म्हणून भीमा नदीच्या काठावरील ज्या गावातून सांडपाणी,मैला मिश्रित पाणी थेट भीमा नदीत मिसळते अशा गावात विविध उपाययोजना करण्याचे नियोजन करण्यात आले होते.मात्र सरकार बदलले आणि नमामी चंद्रभागा योजनेस ब्रेक लागला.आमदार प्रशांत परिचारक यांनी विधानपरिषदेत या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चंद्रभागा नदीच्या प्रदूषणाबाबत प्रश्न उपस्थित केल्यामुळे नमामी चंद्रभागा योजनेसाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद होणार का याची उत्सुकता आता पंढरपूरकरांना आणि विठ्ठल भक्तांना लागली आहे.