दि. २३/०८/२०२१ रोजी अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत कुचेकर यांना प्राप्त गोपनीय माहिती नुसार पुळूज तालुका पंढरपुर येथील मानसी किराणा व जनरल स्टोअर्स या आस्थापनाची तपासणी केली असता या किराणा दुकानात विमल पान मसाला, व्ही १ तंबाखू, सुपरजेम पानमसाला, एस ९९ तंबाखू, आर एम डी पान मसाला, एम सुगंधित तंबाखू इत्यादींचा एकूण ४१४९०/- किमतीचा साठा अन्न पदार्थांच्या आड लपवून विक्रीसाठी साठा ठेवण्यात आल्याचे आढळुन आले.
सहाय्यक आयुक्त (अन्न). श्री. प्र. मा. राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न निरीक्षक प्रशांत कुचेकर यांनी यांनी सदर किराणा दुकानाची तपासणी करून प्रतिबंधित गुटखा,सुगंधी तंबाखू आदींचा साठा सील करून ताब्यात घेतला आहे. आरोपी पेढी मालक उमेश बाबू बाबर यांचेवर अन्न सुरक्षा व मानदे कायदा शिक्षपात्र कलम ५९ व भा द वि कलम १८८, २७२, २७३,३२८ प्रमाणे तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला असून सदर प्रकरणातील आरोपीने साठा कोठून आणला, कोणाला देणार होते, अजून कोठे साठा करून ठेवला आहे का, या व्यवसायातील भागीदार कोण आहे का याची माहिती मिळणे करिता सरकारतर्फे सदर फिर्याद देण्यात आली आहे.
सर्व अन्न व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा कायद्याचे तंतोतंत पालन करूनच व्यवसाय करावा, अन्यथा अन्न व औषध प्रशासनाकडून कठोर कारवाईची पावले उचलण्यात येणार आहेत असे आवाहन पुणे विभागाचे सह आयुक्त श्री. शिवाजी देसाई यांनी केले आहे.
