ताज्याघडामोडी

सरपंच निवडीवर रोपळे विकास पॅनलचा बहिष्कार

पंढरपूर- तालुक्यातील रोपळे येथील सरपंच पदाच्या निवडीवर रोपळे विकास पॅनलने सलग दुसर्‍या दिवशी बहिष्कार टाकला असून याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडून न्याय न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा नूतन सदस्यांनी दिला आहे.यावेळी रोपळे ग्रामस्थांच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यास प्रमोद गणगे, अनिल कदम, सिध्देश्‍वर भोसेले, विलास भोसले, हनुमंत कदम, विष्णू खरे आदी उपस्थित होते. 

रोपळे ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंधरा पैकी तेरा सदस्य रोपळे विकास पॅनलचे विजयी झाले आहेत. मात्र सरपंच पदाचे आरक्षण अनुसूचित जमाती महिलासाठी राखीव असून या जमातीचा उमेदवार सत्ताधारी गटाकडे नाही. दरम्यान या पदासाठी एकमेव निवडून आलेल्या उमेदवार शशिकला दिलीप चव्हाण यांनी शासकीय जागेत अतिक्रमण केले असल्याचा आरोप सत्ताधारी गटाने केला आहे. ग्रामपंचायत निवडणुकी दरम्यान अर्ज दाखल करताना याबाबत सर्व पुरावे सादर करण्यात आले होते. यावर प्रशासनाने कोणतीच कारवाई केली नाही. विशेष म्हणजे चव्हाण यांनी पाठबंधारे विभागाच्या जागेवर अतिक्रमण केले असल्याने त्यांना मागील वर्षी याच विभागाने अतिक्रमण काढण्याबाबत नोटीस देखील दिली असल्याचा पुरावा ग्रामस्थांनी सादर केला. चव्हाण यांचे सरपंदपद धोक्यात येणार असल्यानेच त्यांच्या गटाच्या दिनकर कदम यांनी ग्रामपंचायतीच्या रजिस्टर मध्ये देखील खाडाखोड केली आहे. याबाबत दोन दिवसापूर्वी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा देखील झाला आहे. 

सदर सर्व पुरावे जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आले आहेत. यामुळे शशिकला चव्हाण यांचे सरपंचपद रद्द करावे अन्यथा सर्व ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *