गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

मिरचीपूड डोळ्यांत फेकून लुटायचे, दरोडेखोर पोलिसांच्या जाळ्यात

सांगली: दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा रचून जेरबंद केले. मिरज-म्हैसाळ मार्गावर रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईत चार दरोडेखोरांना पकडण्यात पोलिसांना यश आले. तर एक दरोडेखोर पसार झाला. त्याचा शोध सुरू आहे. पोलिसांनी दरोडेखोरांकडून मिरचीपूड, कोयते, लोखंडी रॉड, हातोडी, मोबाइल जप्त केले आहेत.

निमजी इगलिस काळे (वय ६२), परारी उर्फ गागुली निमजी काळे (१९), सोमनाथ निमजी काळे (२०), विशाल निमजी काळे (२४, सर्व रा. कोडगाव तांडा, धूपखेडा, ता. पैठण, जि. औरंगाबाद) अशी अटकेतील दरोडेखोरांची नावे आहेत. सचिन निमजी काळे हा पळून गेला. त्याचा शोध सुरू आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाढत्या चोऱ्या रोखण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस यांना मिरज-म्हैसाळ मार्गावर काही संशयितांचा वावर असल्याची माहिती मिळाली होती. यानुसार रविवारी रात्री उशिरा गस्त घालताना वांडरे ट्रेडर्सच्या आडोशाला चार ते पाच संशयित लपून बसल्याचे आढळले. यावेळी पोलिसांनी सापळ रचून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता, यातील काही जणांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून चौघांना पकडले, तर एक जण पोलिसांना गुंगारा देऊन पळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *