एखाद्या सर्व्हे नंबरचे क्षेत्र दोन एकर आहे . त्याच सर्वे नंबरमधील तुम्ही एक , दोन अथवा तीन गुंठे जागा विकत घेणार असेल , तर त्यांची दस्त नोंदणी होणार नाही . मात्र , त्याच सर्वे नंबरचा ‘ ले – आउट ‘ करून त्यामध्ये एक , दोन गुंठयांचे तुकडे पाडून त्यास जिल्हाधिकारी किंवा सक्षम प्राधिकरणाची मंजुरी घेतली असेल तर अशा मान्य ले – आउट ‘ मधील एक , दोन गुंठे जमिनीच्या व्यवहाराची दस्त नोंदणी होऊ शकणार आहे . यापुर्वीच ज्या पक्षकाराने प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी तुकडयाची खरेदी घेतली असेल , अशा तुकडयाच्या खरेदी विक्री व्यवहारासाठी सुध्दा उक्त कायदयातील कलम ८ ब नुसार सक्षम प्राधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांची परवानगी आवश्यक आहे . एखादा अलहीदा निर्माण झालेल्या तुकडयाची शासन भुमी अभिलेख विभागामार्फत हददी निश्चित होऊन / मोजणी होवून त्याचा स्वतंत्र हदद निश्चितीचा मोजणी नकाशा देण्यात आला असेल अशा क्षेत्राचे विक्री करण्यासाठी परवानगीची आवश्यकता राहणार नाही . शासनाने कायद्याने बंदी घातल्यानंतर व गुंठेवारीची दस्त नोंदणी केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देऊनही राज्यात प्रामुख्याने मोठ्या शहरामध्ये आजही सर्रास बेकायदेशीरपण गुंठेवारीची दस्त नोंदणी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांनी गुंठेवारीचे दस्त करणारे पुण्यातील भोसरी येथील दुय्यम निबंधक निलंबित केले. शासनाच्या आदेशानंतर राज्यातील ही पहिलीच कारवाई ठरली आहे.
दुय्यम निबंधक यांना दस्त नोंदणी करतांना दर नमुद केलेल्या महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रिकरण करण्याबाबत (सुधारणा) अधिनियम, २०१५ कलम ८ब मधील परंतुक मध्ये नमुद केल्याप्रमाणे मंजूर केलेला पोटविभाग किंवा रेखांकन दस्तासोबत न जोडता दस्त नोंदणीस स्विकारता येणार नाही. असे असताना हवेली तालुक्यातील भोसरी येथील सह दुय्यम निबंधक यांनी बेकायदेशीरपणे गंठेवारीचे शेकडो दस्तांची बेकायदेशीर नोंदी केल्याचे तपासणीत समोर आल्याने हर्डीकर यांनी एल.ए. भोसले यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई केली.
