ताज्याघडामोडी

मंत्रालयासमोर विष पिऊन छावा संघटनेतील पदाधिकाऱ्यांचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई : मराठा आरक्षण प्रश्नी कोणतीही हालचाल न झाल्यामुळे अखेर आज जालना जिल्ह्यातील छावा संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी मंत्रालयासमोर विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु यावेळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी तत्काळ कारवाई करत या पाचही आंदोलकांना ताब्यात घेतलं. त्यानंतर सर्व आंदोलकांना मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात नेण्यात आले. या आंदोलकांनी पोलीस प्रशासन आपल्यावर दबाव आणत असल्याचा आरोप केला आहे.

पोलिसांनी ताब्यात घेतलेले सर्व पदाधिकारी जालना जिल्ह्यातील रहिवाशी आहेत. यामध्ये अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवकर्ण वाघ पाटील, मराठवाडा कार्याध्यक्ष संतोष जेधे, जिल्हाकार्याध्यक्ष राधाकिशन शिंदे, अंबड तालुकाध्यक्ष राधेश्याम पवळ आणि घनसावंगी तालुकाध्यक्ष नानासाहेब जोगदंड आणि युवक जिल्हासंघटक ज्योतिराम माने यांचा समावेश होता. या सर्व कार्यकर्त्यांची मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या, आझाद मैदानात मागील 29 दिवसांपासून आंदोलन करत असलेल्या मुलांच्या नोकरीचा प्रश्न तत्काळ सोडवा आणि सरकाने जाहीर केलेली भरती प्रक्रिया त्वरित थांबवावी, अशी मागणी आहे.

याप्रकरणी अखिल भारतीय छावा संघटना, जालना यांनी 10 फेब्रुवारीला जालना जिल्हाधिकार्‍यांना मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवा, अन्यथा आम्ही विष प्राशन करून आत्महत्या करू अशा पद्धतीचा इशारा देणार निवेदन दिलं होतं. यासोबतच पाच दिवसांचा कालावधी देखील दिला होता. परंतु या कालावधीत काहीच साध्य न झाल्यामुळे या सर्व कार्यकर्त्यांनी मुंबईला येऊन मंत्रालयासमोर विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.

हे सर्व कार्यकर्ते आज दुपारी दोनच्या सुमारास मंत्रालयासमोर दाखल झाले. परंतु याठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात होता. आंदोलक गाडीतून उतरताच पोलिसांनी तत्काळ त्यांना ताब्यात घेतले. यावेळी आंदोलक आणि पोलीस यांच्यामध्ये जोरदार झटापट देखील झाली. पोलिसांनी यासर्व आंदोलकांच्या खिशात असणाऱ्या विषयाच्या बाटल्या काढून घेतल्या आणि या सर्वांना मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात घेऊन गेले. पोलीस ठाण्यात त्यांना काही वेळ बसवल्यानंतर त्यांना पोलीस बंदोबस्तात मुंबईबाहेर पनवेल येथे सोडण्यात आले.

दरम्यान, याबाबत बोलताना जालना छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवकर्ण वाघ पाटील म्हणाले की, “मागील जवळपास दीड महिन्यापासून जालना जिल्ह्यातील एका गावात आमचे मराठा बांधव आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत. परंतु आजपर्यंत या आंदोलकांची सरकारने दखल घेतली नाही. यासोबतच मुंबईतील आझाद मैदानात देखील 29 दिवसांपासून आमचे मराठा बांधव नोकरीसाठी आंदोलन करत आहेत. परंतु, अजूनही आंदोलकांची दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे आम्ही विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *