ताज्याघडामोडी

अभिजीत पाटील यांनी चौंडी येथील उपोषणास भेट घेऊन जाहीर पाठिंबा दिला

पंढरपूर व मंगळवेढ्यातील समाजातील पदाधिकारी उपस्थित

प्रतिनिधी/- 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चौंडी येथे यशवंत सेनेच्या वतीने गेले १७ दिवस चालू असलेल्या आमरण उपोषणाला राष्ट्रवादीचे नेते श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील व पंढरपूर व मंगळवेढ्यातील धनगर समाजातील पदाधिकाऱ्यांसह भेट घेऊन जाहीर पाठिंबा पत्र दिले. 

गेली अनेक वर्षे महाराष्ट्रामध्ये धनगर समाज एस.टी. आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्रभर लढा देत आहे. परंतु सरकार आज या लढ्याला गांभीर्याने पाहत नाही. गेले ७० वर्षापासून धनगर जमातीला अनुसूचित जमातीच्या सवलतींपासून वंचित ठेवण्यात आले आहे. धनगड या शब्दाची धनगर अशी घटना दुरुस्ती करून केंद्र सरकारने अंमलबजावणी करावी, त्यासाठी राज्य सरकारने घटनादुरुस्तीचा अध्यादेश केंद्र सरकारला पाठवावा. 

भारतात अनेक राज्यात धनगर समाजाला अनुसूचित जाती, जमातीच्या सर्व सवलती आरक्षण असल्यामुळे मिळत आहेत परंतु महाराष्ट्रामध्ये याचे फक्त राजकारण केले जात आहे. ही फार मोठी शोकांतिका आहे.त्यामुळे महाराष्ट्र सरकारने गांभीर्याने विचार करून धनगर समाजाला न्याय द्यावा अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात आरक्षण आंदोलनाच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारचा निषेध करण्यात येईल. 

यशवंत सेनेचे उपोषणकर्ते श्री.अण्णासाहेब रुपनवर आणि श्री.सुरेश भाऊ बंडगर यांची तब्येत खालावली आहे. त्यांच्या जीवाला काही धोका निर्माण झाल्यास सरकार त्यास जबाबदार राहील. राज्य सरकारने धनगर आरक्षण अंमलबजावणी बाबत त्यासाठी त्वरित निर्णय घ्यावा हीच अपेक्षा.

यावेळी पंढरपूरचे आदित्य फत्तेपुरकर, विठ्ठल पाटील, संचालक बाळासाहेब हाके, सिद्धेश्वर बंडगर, धनामामा खरात, प्रवीण कोळेकर, रायाप्पा हळणवर, शालिवाहन कोळेकर, नारायण मेटकरी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, कार्याध्यक्ष सचिन आटकळे, संजय शिंदे, दत्तात्रय येडगे, संतोष बंडगर, आनंद पाटील, आनंद मदने, बाबासाहेब येडगे, दत्ता खरात, अतुल गायकवाड यासह अनेक मंडळी उपस्थित राहून पाठिंबा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *