Uncategorized

व्यंकटराव भालके पुन्हा मिशन मोडवर !

             पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाचे आमदार स्व.भारत भालके यांच्या निधनानंतर या दोन्ही तालुक्यातील स्व.भारतनाना प्रेमी जनतेमध्ये आणि विठ्ठल परिवारामध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली असून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन हा तालुक्याचा आमदार झाला पाहिजे यासाठी या कारखान्याशी निगडित आणि पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात परिचारक विरोधी गट म्हणून समर्थकांना जवळपास तीस वर्षे प्रतीक्षा करावी लागली होती.२००२ मध्ये स्व.भारत भालके यांनी विठ्ठल कारखान्याच्या चेअरमनपदाची धुरा आपल्या हाती घेतली आणि पंढरपूर तालुक्याच्या राजकीय पटलावर भारत भालके यांच्या रूपाने नवा नेता उदयास आला.इथूनच स्व.आमदार भारत भालके यांची आमदारकीच्या दिशेने पावले पडू लागली. तालुक्याच्या राजकरणात परिचारक विरोधी गट म्हणून वावरणारा पूर्वाश्रमीचा आण्णा गट असो अथवा १९९६ ला अस्तित्वात आलेला विठ्ठल परिवार असो फुटीचा शाप असल्यागत कायम फाटाफूट होत गेली आणि ”विट्ठलचा”चेअरमन आमदार झाला पाहिजे हे स्वप्न धूसर होत गेले.२००७ साली निवडणूक आयोगाने विधानसभा मतदार संघाची पुनर्र्चना केली आणि या पुनर्र्चनेमध्ये पंढरपूर तालुक्यातील मतदार हा चार विधानसभा मतदार संघात विभागला गेला.संपूर्ण मंगळवेढा तालुका आणि पंढरपूर शहर व तालुक्यातील २२ गावांचा समावेश असलेला पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघ अस्तित्वात आला.२००४ मध्ये झालेल्या तिरंगी लढतीत राष्ट्रवादी कॉग्रेसकडून स्व.सुधाकरपंत परिचारक,अपक्ष उमेदवार म्हणून स्व.राजबापू पाटील तर शिवसेनेचे उमदेवार म्हणून  स्व.आमदार भारत भालके यांनी निवडणूक लढवीली होती.आणि या निवडणुकीत तालुक्यातील परिचारक विरोधी गट विभागला गेला आणि  स्व.राजबापू पाटील तर शिवसेनेचे उमदेवार म्हणून  स्व.आमदार भारत भालके यांना पराभव पत्करावा लागला होता.२००६ मध्ये झालेल्या विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीत स्व.  आ.भारत भालके यांनी निर्विवाद यश संपादन केले आणि आमदारकीच्या दिशेने त्यांची पावले वेगाने पडू लागली.मात्र मतदार संघाची रचनाच बदलली गेल्यामुळे पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघात तालुक्यातील केवळ २२ गावाचा समावेश झाला.१९९५ पासूनचा विधानसभा निवडणुकीचा इतिहास पाहता पंढरपूर शहरात परिचारक गट वरचढ राहिल्याने स्व.आमदार भारत भालके यांची मदार ही तालुक्यातील २२ गावे आणि संपूर्ण मंगळवेढा यावर होती.त्यावेळी स्व.आमदार भारत भालके यांच्यासाठी त्यांचे पुतणे व माजी जिल्हा परिषद सदस्य व्यंकटराव भालके हे गेमचेंजर ठरले होते.पुनर्रचित मतदार संघाचा आदेश हाती पडल्यापासून व्यंकटराव भालके यांनी मंगळवेढा शहर व तालुका पिंजून काढण्यास सुरुवात केली होती आणि राजकारणातले सारे प्रयोग करीत त्यांनी अगदी गावागावात व्यक्तिगत संपर्क तयार करून  स्व.आमदार भारत भालके हे नाव घराघरात पोहोचविण्यात सिहाचा वाटा उचलला होता.मात्र गेल्या काही वर्षांपासून व्यंकटराव भालके हे राजकारणापासून काहीसे अलिप्त होत शेतीची जबाबदारी पार पाडीत आले असले तरी विधानसभा निवडणुकीच्या ”शेवटच्या”घडामोडीत ते कायम पद्याआड राहून महत्वपूर्ण भूमिका पार पाडत आले आहेत.
             स्व.आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनाचा धक्का पचविणे जसे त्यांच्या समर्थकांना जड गेले तसेच व्यंकटराव भालके यांनाही प्रचंड मोठा धक्का बसला होता.एवढेच काय तर स्व.आमदार भारत भालके यांना पुन्हा रुबी हॉल क्लिनिक मध्ये उपचारासाठी दाखल केल्यानंतर व त्यांची प्रकृती अतिशय खालावल्या नंतर हि माहिती त्यांच्या पर्यंत पोहोचू नये याची व्यवस्था करण्यात आल्याची चर्चा असून व्यंकटराव भालके यांना हा धक्का सहन होणार नाही हीच त्यामागचे कारण होते. 
             मात्र आता स्व.आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर व्यंकटराव भालके हे सावरले असल्याचे दिसून येत असून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी भगीरथ भालके यांची निवड झाल्यानंतर आता आगामी पोटनिवडणुकीत भगीरथ भालके हे आमदार झाले पाहिजेत यासाठी पुन्हा मिशन मोडवर आले असून जोरदार व्युव्हरचना करताना दिसून येत आहेत.सध्या दोन्ही तालुक्यात ग्राम पंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून यात जास्तीत जास्त ग्रामपंचातीवर स्व.आमदार भारत भालके गटाचा व विठ्ठल परिवाराचा ताबा राहिला पाहिजे यासाठी त्यांनी २००७ ते २००९ प्रमाणे पुन्हा एकदा पायाला भिंगरी बांधत दोन्ही तालुके पिंजून काढण्यास सुरुवात केली असल्याचे दिसून येत आहे.सर्व सामान्य जनता आणि सर्व सामान्य कार्यकर्ते,समर्थक याना सन्मान देण्याची  स्व.आमदार भारत भालके यांची कायर्पद्धती त्यांनी आतापर्यंत अंगिकारली असल्याने पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यात पुढील महिन्यात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका व एप्रिल किंवा मे महिन्यात होणारी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूकी मध्ये व्यंकटराव भालके हे नक्कीच संकटमोचक ठरतील असा विश्वास स्व.आमदार भारत भालके सर्मथकांकडून व्यक्त केला जात आहे.      

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *