ताज्याघडामोडी

मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्न करा उपविभागीय अधिकारी ढोले यांच्या सूचना

मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्न करा ; उपविभागीय अधिकारी ढोले यांच्या सूचना

 

      पंढरपूर, दि. २९ : तालुक्यातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी तात्काळ उपचार तसेच  बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध  घेवून, वेळेत उपचार करावेत, अशा सूचना उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी दिल्या.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच करण्यात आलेल्या उपाययोजनाबाबत प्रांत कार्यालय पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले, उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ.जयश्री ढवळे, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुंजकर, पोलीस निरिक्षक अरुण पवार तसेच शहरातील खाजगी रुग्णालयाचे डॉक्टर उपस्थित होते.

श्री. ढोले म्हणाले,  कोरोना मधील रुग्णांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी बाधित व्यक्तीवर वेळेत उपचार करुन, बाधित व्यक्तीच्या संपर्कातील सर्वांची तपासणी करावी.  रुग्णालयात मुबलक औषधसाठा राहील याची दक्षता घ्यावी. मृत्यूदर कमी करण्यासाठी  वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिक्षक तसेच खाजगी रुग्णालयाचे डॉक्टर यांनी समन्वयाने प्रयत्न करावेत. रुग्णासाठी तात्काळ रुग्णवाहिका उपलब्ध व्हाव्यात यासाठी नियोजन करावे. ऑक्सिजनची वाढती गरज लक्षात घेता उपलब्धता करावी. तसेच त्यांच्या किंमती अनियंत्रित राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी. असे प्रांताधिकारी ढोले यांनी सांगितले.

गृह विलगीकरणातील बाधित नागरिकांनी रुग्णालयात उपचार घ्यावेत. महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ जास्तीत –जास्ता नागरिकांना लाभ द्यावा. हिवाळा व हिवाळ्यात होणारे वायूप्रदुषण तसेच आय सी.एम.आर यांच्या निर्देशानुसार हिवाळ्यात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनाच्या सर्व यंत्रणानी सतर्क राहून वेळेत उपाययोजना करव्यात अशा सूचनाही श्री. ढोले यांनी दिल्या .

 ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा अधिकाअधिक सक्षम करुन, जास्ती-जास्त नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याठी आरोग्य विभागामार्फत योग्य. नियोजन करण्यात आले असल्याची माहिती गटविकास अधिकारी घोडके यांनी दिली.

   तालुक्यातील आठ प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर, ग्रामीण रुग्णालय करकंब, एम.आय.टी वाखरी, तसेच नगरपालिका नागरी आरोग्य केंद्र क्रं.1 काळा मारुती येथे सोमवार, बुधवार, शुक्रवार व  नागरी आरोग्य केंद्र क्रं.2 भिंगे हॉस्पिटल शेजारी येथे मंगळवार, गुरुवार, शनिवार या  प्रमाणे मोफत कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी  सकाळी 11.00 ते दुपारी 2.00 वाजेपर्यत आपली तपासणी करुन घ्यावी असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.बोधले यांनी सांगितले.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *