ताज्याघडामोडी

लोकप्रतिनिधींनो आणि त्यांच्या कट्टर समर्थकांनो ”नो पॉलिटिक्स प्लिज” !

लोकप्रतिनिधींनो आणि त्यांच्या कट्टर समर्थकांनो
”नो पॉलिटिक्स प्लिज” !

आ.भालके -आ.परिचारक यांनी आता जनतेच्या समस्या सोडविण्याची ईर्षा करावी 

गेल्या ५४ दिवसापासून पंढरपूरचे अर्थचक्र थांबले असताना,पंढरपूर शहर तालुक्यतील जनता कोरोनाच्या भीतीने आणि उदरनिर्वाहाच्या चिंतेने चिंतातुर होऊन वावरताना दिसून आली आहे. या शहर तालुक्यातील याच सर्वसामान्य नागिरकांनी व्यक्त केलेल्या भावना,चिंता,संताप आणि भीती अजून आमच्या कानात घोंगावत आहे.तर आर्धी खाऊन सुख मानत आलेल्या मध्यमवर्गीयांची झालेली होरपळ निश्चितच वेदनादायी आहे.कवडीच्या दंडाच्या अपमानापायी प्राण त्याग करणाऱ्यांनी एकेकाळी या शहराचे नेतृत्व केले आहे हे ध्यानात असल्यामुळेच या शहरातील आजची आणि कालची पिढीही छोटा-मोठा व्यवसाय करीत असताना स्वाभिमानाने जगणारी आहे.मात्र कोरोनाच्या अभूतपूर्व संकटामुळे व्यवसाय उद्योग ठप्प झाल्यामुळे या शहरातील अगदी बिगारी काम करणाऱ्यापासून ते मॉल,शोरूम मध्ये कामगार करणारा कामगार ते रस्त्यावर बसून चप्पल दुरुस्ती करणारा आमचा चर्मकार बांधव हे सारेच जीवनाची आणि जगण्याची लढाई स्वाभिमानाने लढत आहेत.अर्थात लोकप्रतिनिधी म्हणून यांच्यातुमच्याकडून फार अपेक्षा आहेत.त्यामुळेच निदान या कठीण काळात तरी लोकप्रतिनिधी म्हणून समनव्याने या शहरातील सामान्य लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आक्रमक व्हावे हि भावना व्यक्त होत असतानाच कानभरु कार्यकर्त्यांना बाजूला सारून थेट जनतेशी संवाद साधने गरजेचे आहे.
गेल्या तीन दिवसापासून पंढरपूर शहरातील राजकारणात विसंवादी विनोद घडत असताना दिसून येत आहेत.आणि सामान्य जनता या राजकीय साठमारीला मनावर न घेता संताप व्यक्त करीत आहेत.पंढरपूर शहराचे दोन मोठे दुखणे आहेत.एक म्हणजे वारी आधारित अर्थकारणाच्या ,भाविकभक्तांच्या जीवावर जगावं लागणारा फार मोठा वर्ग आहे तर या शिक्षण,उच्च शिक्षण घेऊन देखील या शहर-तालुक्यात रोजगार देणारे उद्योग धंदे नसल्यामुळे आपल्या आई वडिलांना,कुटुंबाचा विरह सहन करीत महानगराची वाट धरणारे तरुण आता या शहर तालुक्यात कोरोनामुळे परत येत आहेत.या पैकी बहुतांश तरुण हे भूमीहीन आणि दुबर्ल कुटुंबातील आहेत.आता त्यांचा महानगरातील रोजगार गेला आहे.पुण्यामुबंईतील कंपनीमध्ये दहा विस हजारात काम करणारे हे बहूतांश युवक मजबुरी म्हणून घर सोडून गेले होते.आणि यासाठी यास कोण जबाबदार आहेत या बाबत याच तरुणांची प्रतिक्रिया दोन्हीही लोकप्रतिनिधींना कधीच रुचणार नाही.
पंढरपूर शहराबद्दल बोलायचे झाले तर गेल्या ५४ दिवसात या शहरातील अनेक सर्वसामान्य कुटुंबानी या संकटाचा जो सामना केला आहे तो आपल्या जवळच्या तुटपुंज्या शिलकीवर.रेशनवर तांदूळ आणि गहू दिला कि आपल्या मतदार संघात सारे आलबेल आहे असा जर या लोकप्रतिनिधींचा समज असेल तर तो गैरसमज यांनी जनतेत रूप पालटून फिरल्याशिवाय तरी दूर होणे अश्यक्य आहे.पंढरपुर शहरातील विविध दुकाने,हॉटेल,वस्तू विक्रीचे इतर दुकाने व्यवसाय आदी ठिकाणी जवळपास ८ हजार तरुण कामगार म्हणून काम करतात.आपल्या सात-आठ हजाराच्या पगारात मोबाईलचा,बायकोच्या बचत गटाचा हप्ता,दवाखाना आकस्मात संकटकाळी खाजगी सावकाराकडून घेतलेल्या आठवडा हप्त्याची रक्कम भागवतात,व्याज भागवतात ते कामगार आज दुकाने बंद असल्यामुळे हतबल झाले आहेत.कामगारांचे पगार द्या असा आदेश केंद्र आणि राज्य शासनाने काढला असला तरी अर्धा तास लेट झाला तरी अर्ध्या दिवसाचा पगार कापणारा मालक पगार सोडा उचल देण्यासही तयार नाही अशी बिकट परिस्थिती आहे.अर्थात सगळेच व्यापारी व्यवसायिक हे व्यवहारी नाहीत ठरत अनेकजण माणुसकी धर्म पाळणारे आहेत.अगदी आपल्या दुकानात २०-२५ वर्षे काम केलेल्या नोकरास पेन्शन म्हणून महिना हजार दोन हजार देणारे देखील आहेत पण असे हाताच्या बोटावर मोजण्याइतके आहेत.
बांधकाम व्यवसाय ठप्प असल्यामुळे सिमेंटच्या,सळईच्या दुकानात गाडी भरणाऱ्या हमालापासून ते सेंट्रिक काम करणारा,बिगारी काम करणारा,गवंडी काम करणारा,सुतार काम करणारा,रंगकाम करणारा एवढेच काय नदीला रात्रीच्या वेळी जीव धोक्यात घालून वाळूची पोती भरून होडीत ठेवणारा देखील शिल्लक संपत आल्यामळे हतबल झाला आहे.आणि याच वेळी त्याला आधार वाट्णारे नेतृत्व एबीसीडीच्या वादात गुरफटले आहे आणि कार्यकर्ते माझा नेता कसा बरोबर हे सांगण्यात.
या वर्षी चैत्री वारीही भरली नाही आणि आता आषाढी वारीही भरण्याची शक्यता धूसर झाली आहे.आली वारी फुगले गाल,झाली वारी देणे देऊन कंगाल हि येथील बहुतांश लोकांच्या अर्थकारणाची दशा.आषाढी झाली कि मुलांच्या शाळेचा गणवेश घेणे,वह्या पुस्तके घेणे,शाळेची फी भरणे,म्युन्सिपल कर भरणे,किराणावाल्याची उधारी चुकविणे आणि पुन्हा नवे देणे काढण्यास स्वतःला सक्षम बनविणे हि मानसिकता या शहराचे नेतृत्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या हतबलतेमुळे आली आहे याची जबाबदारीच कधी लोकप्रतिधी मान्य करीत नाहीत.
सध्या राजकीय वातावरण पेटवलेल्या या दोन्ही लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या समर्थकांना मी सांगू इच्छितो,हा काळ गरीबाची चूल कशी पेटेल याचा एकत्र येऊन विचार करण्याचा आहे.अन्यथा जेवढे तरुण सद्या बेकार झाल्यामुळे नाईलाजाने आपल्या शहर तालुक्यात दाखल झाले आहेत त्याच्या दुप्पट संख्येने हा कोरोनाकाळ संपल्यावर त्याच्या दुप्पट संख्येने या शहर तालुक्यातील बेरोजगार तरुण घर-दार ,आई वडील सोडून पोट भरण्यासाठी निघून जातील आणि तुम्हाला निवडणुकीत ‘आगे बढो’म्हणणाऱ्यांची संख्या कमी होईल.
लोकप्रतिनिधी म्हणून आपली जबाबदारी आपण सक्षमपणे पार आहोत असा जर या लोकप्रतिनिधीचा आणि त्यांच्या समर्थकांचा भ्रम असेल माझ्याकडे सर्वसामान्य जनतेचे अनेक प्रश्न शिल्लक आहेत. ते या दोन्ही लोकप्रतिनिधींनी इर्षेने सोडवावेत हीच अपेक्षा !
– राजकुमार शहापूरकर (संपादक -पंढरी वार्ता )

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *