ताज्याघडामोडी

कॉग्रेस हायकमांडकडून आ.प्रणिती शिंदेचा पत्ता कट 

कॉग्रेस हायकमांडकडून आ.प्रणिती शिंदेचा पत्ता कट 

सुशीलकुमार शिंदेंचे अपयश आणि अनास्था ठरली कारणीभूत ? 

एकेकाळी सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातील दुसरा ध्रुव समजले जाणारे व जिल्ह्याचे नेते म्हणून कॉग्रेसमध्ये वावरत असताना अनेक वर्षे राज्यमंत्रिमंडळात महत्वाचे खाते सांभाळत थेट मुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारलेले सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आ. प्रणिती शिंदे यांचा महाविकास आघाडीच्या मंत्रमंडळात समावेश होईल अशी खात्री त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त केली जात असतानाच व दिल्ली दरबारी सुशीलकुमार शिंदे यांचे वजन असतानाही आ. प्रणिती शिंदे यांना दिल्ली दरबारी निश्चित झालेल्या कॉग्रेस मंत्र्यांच्या यादीतून वगळण्यात आले आहे.या मुळे आ.प्रणिती शिंदे यांचा मतदार संघ असलेल्या  सोलापूर मध्य मतदार संघातील त्यांचे समर्थक प्रचंड नाराज झाले आहेत तर जिल्ह्यातील इतर कॉग्रेस कार्यकर्त्यांकडूनही तुरळक प्रमाणात नाराजी व्यक्त होत आहे.मात्र आ. प्रणिती शिंदे यांना मंत्रिपद नाकारण्यामागे सुशीलकुमार शिंदे यांचे अपयश आणि पक्षवाढी बाबत असेलेली अनास्था हेच कारण असल्याची कुजबुज आता कॉग्रेसच्याच समर्थकामामध्ये होताना दिसून येत आहे.                     गेल्या ४० वर्षाच्या सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय वाटचालीचा आढावा घेतला तर यापैकी तीन दशके सोलापूर आणि अकलूज हेच जिल्ह्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू होते.सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणावर मोहिते-पाटील गटाचा तर सोलापूर शहर व दक्षिण सोलापूर तालुक्याच्या राजकारणावर सुशीलकुमार शिंदे यांची मोठी पकड होती.मात्र याच बळावर सुशीलकुमार शिंदे यांनी कॉग्रेसमध्ये अतिशय महत्वाचे स्थान प्राप्त केले होते.१९८१ पासून त्यांचा राज्याच्या मंत्रिमंडळात समावेश होता तर ९ वर्षे ते राज्याचे अर्थमंत्री होते.आणि पुढे त्यांना पक्षाने मुख्यमंत्रीपदाचीही संधी दिली होती.कॉग्रेसचे निष्ठावन्त नेते म्हणून कॉग्रेस पक्षाने सुशीलकुमार शिंदे यांना भरभरून दिले पण जेव्हा पक्ष अडचणीत आला तेव्हा मात्र पक्षाच्या वाढीसाठी राज्यात किमान पक्षी सोलापूर जिल्ह्यात तरी सुशीलकुमार शिंदे यांचे मोलाचे योगदान मिळणे जिल्ह्याचे नेते म्हणून अपेक्षित होते मात्र तसे होताना दिसले नाही.२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ते पराभूत झाले आणि कॉग्रेसच्या वरिष्ठ वर्तुळात त्यांच्या पराभवाची जोरदार चर्चा झाली.त्या नंतर २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतही सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदार संघ शहरात कॉग्रेसची वाताहत झाली.  

     २०१४ मधील लोकसभा व विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात कॉग्रेसमध्ये आलेली मरगळ पाहता जिल्हयाचे नेते म्हणून सुशीलकुमार शिंदे हे अधिक जोमाने प्रयत्न करतील किमान त्यांचे होमग्राउंड असलेल्या सोलापूर शहरात तरी डॅमेज कंट्रोल मध्ये यशस्वी होतील व २०१९ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पक्षाला घवघवीत यश मिळवून देतील अशी अपेक्षा असताना लोकसभा निवडणुकीत ते राजकारणात नवख्या असलेल्या खा. जयसिद्धेश्वर यांच्याकडून पराभूत झाले आणि त्यांच्या या पराभवाची पुन्हा दिल्लीदरबारी चर्चा झाली. 

     नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत राज्याचे माजी मुख्यमंत्री म्हणून राज्यातील मतदारांवर विशेषतः मागासवर्गीय व अल्पसंख्यांक मतदारावर प्रभाव पाडण्यात सुशीलकुमार शिंदे हे स्टार प्रचारक म्हणून भूमिका पार पडतील अशी अपेक्षा होती.मात्र सोलापूर शहर मध्य मतदार संघात आ. प्रणिती शिंदे यांनाच विजयासाठी मोठा संघर्ष करावा लागल्याचे दिसून आले.त्यामुळेच सुशीलकुमार शिंदे यांनी कॉग्रेस पक्षाच्या वाढीसाठी पुन्हा जिल्ह्यातून नव्याने सुरुवात करावी अशी अपेक्षाही अनेक जेष्ठ कॉग्रेस समर्थक व्यक्त करीत आहेत.आणि त्यांनी जिल्ह्यात पुन्हा कॉग्रेस बलवान केली तर राज्याच्या मंत्रिमंडळात आ. प्रणिती शिंदे यांचा नक्की समावेश होईल व त्या जिल्ह्याच्या पालकमंत्री होतील असा विश्वासही व्यक्त केला जात आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *