सोलापूर दिनांक 24 (जिमाका):- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत मांग, मातंग, मिनी-मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गोराडी, मादगी व मादिगा या जातीतील गरजू घटकांचा आर्थिक उन्नतीसाठी, तसेच त्यांना स्वंयरोजगाराच्या अधिअधिक संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने सन 2024-25 या वित्तीय वर्षासाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्यावतीने कौशल्य विकास उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. इच्छुक तरुण -तरुणी व विद्यार्थ्यांनी दिनांक 25 डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करावेत असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक आर.एच चव्हाण यांनी केले आहे.
मातंग समाजातील तरुण-तरुणींचे वाढते शैक्षणिक प्रमाण विचारात घेता, समाजातील गरजु तरुण-तरुणींना व्यवसाय प्रशिक्षण देऊन त्यांना उपजिविकेचे साधन उपलब्ध व्हावे या उद्देशाने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्यावतीने कौशल्य विकास उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. सदर प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत खादी व ग्रामोद्योग आयोग,भारत सरकार,डॉ.बी.आर.आंबेडकर ग्रामीण प्रोद्योगीकी व प्रबंधन संस्था,नाशिक, मिटकॉन कन्सलटन्सी आणि इंजिनिअरींग सर्व्हीसेस लिमीटेड,शिवाजीनगर,पुणे, विज्ञान एवं प्राद्योगिक विभाग,सावित्रीबाई फुले विद्यापीठ,पुणे, केंद्रीय मधुमक्षिका पालन संशोधन आणि प्रशिक्षण संस्था,पुणे या चार शासकिय प्रशिक्षण संस्थांकडून विविध ट्रेडचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांसाठी पात्रता, निकष व अटी पुढीलप्रमाणे आहेत. विद्यार्थी मातंग समाजातील व तत्सम बारा पोटजातीतील असावा. त्याचे वय 18 ते 50 वर्षांदरम्यान असावे, यापूर्वी महामंडळाच्या कोणत्याही प्रशिक्षण योजनेचा लाभ घेतलेला नसावा. महाराष्ट्रातील रहिवासी असावा , वार्षिक उत्पन्न तीन लाखापेक्षा जास्त नसावे, एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस सदर योजनेचा लाभ घेता येईल. प्रशिक्षणार्थीने आधारकार्ड जोडलेल्या बँक खात्याचा तपशील सादर करावा.
प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या तरुण-तरुणी/विदयार्थ्यांनी महामंडळाचे जिल्हा कार्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,सात रस्ता,सोलापूर येथे संपर्क साधुन विहित नमुन्यात आवश्यक कागदपत्रांसह दिनांक 15 डिसेंबर ते 25 डिसेंबर 2024 या कालावधीत कागदत्रांसह अर्ज सादर करावा. दिनांक 25 डिसेंबर 2024 नंतर अर्ज स्विकारले जाणार नाहीत, याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक श्री. चव्हाण यांनी केले आहे.