ताज्याघडामोडी

ऊसाच्या फडाला पेटवून देत गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या, गेवराई तालुक्यातील हृदयद्रावक घटना

बीड जिल्ह्यामध्ये अतिरिक्त ऊसाचा प्रश्न आता पेटू लागला आहे. गळीत हंगाम संपायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असताना बीड जिल्ह्यामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणावर ऊस शिल्लक आहे.

अनेक प्रयत्न करूनही आपला ऊस गाळपासाठी जात नसल्याने नैराश्यग्रस्त एका 35 वर्षीय शेतकऱ्याने उभ्या ऊसाच्या फडाला आग लावून ऊसाची फडातील लिंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना गेवराई तालुक्यात घडली आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

बीड जिल्ह्यामध्ये गतवर्षी ऊस लागवडीचे क्षेत्र काही पटीने वाढले. विंक्रमी ऊस लागवडीमुळे अतिरिक्त ऊसाचा प्रश्न गंभीर झाला. आठ महिन्यांपासून बीड जिल्ह्यातील कारखाने ऊस गाळप करत आहेत. तरीही अजून पंधरा लाख मेट्रीक टन ऊस शिल्लक राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ऊसाचे गाळप न झाल्यास शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान होते. एक तर उभ्या ऊसाचे पाचट होते आणि खरिप हंगाम धोक्यात येतो. त्यासाठी कोणत्याही परिस्थितीत ऊसाची तोड व्हावी यासाठी प्रत्येक शेतकरी झगडत आहे धडपडत आहे.

यातच गेवराई तालुक्यातील हिंगणगाव येथे आज दुपारी गंभीर घटना घडली. नामदेव जाधव या तरूण शेतकऱ्याचा दोन एक्कर ऊस आहे. 265 जातीचा ऊस त्याने लावला आहे. या ऊसासाठी वर्षभरात एक लाख रूपये खर्च आला. ऊसाचं वय वाढूनही ऊस जात नसल्याने हा शेतकरी नैराश्येत होता. आता ऊसाचे गाळप होवू शकणार नाही या चिंतेने नामदेव जाधव यांनी बुधवारी दुपारी ऊसाचा फड पेटवून दिला. त्यातच फडात लिंबाच्या झाडाला गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *