(अधिकाऱ्यांसोबत केला रेल्वेचा प्रवास आणि सांगितल्या महत्वपूर्ण त्रुटी)
(मोडनिंब कार्गो टर्मिनल, रेल्वे उड्डाणपूल,माढा रेल्वे सुशोभीकरण, पंढरपूर-मुंबई दररोज रेल्वेची सुविधा, याचबरोबर सांगोला येथे कृषी रेल सुरू करण्याची मागणी आ.अभिजीत पाटील यांनी केली.)
पंढरपूर प्रतिनिधी /-
माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील यांनी विधानसभा सदस्य पदाची शपथ घेतल्यानंतर स्वराज्याची राजधानी रायगड येथे छत्रपतींच्या गादी समोर नतमस्तक झाले होते. यावेळी त्यांनी माढा मतदारसंघात परिवर्तनाची सुरुवात छत्रपतींचे स्मारकाने होणार असल्याचे जाहीर करून माढा मतदारसंघाच्या विकासाचा संकल्प केला होता.
अल्पावधीतच कर्तव्यदक्ष आमदार म्हणून ओळखले जाणारे अभिजीत पाटील यांनी शुक्रवारी कुर्डूवाडी येथे वार्षिक स्टेशन इन्स्पेक्शन संदर्भात आलेले मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर धर्मवीर मीना यांची भेट घेऊन मतदार संघातील विविध ठिकाणी रेल्वे सुविधेबाबत सविस्तर चर्चा करून जनहिताच्या मागण्या मांडल्या. यावर रेल्वे अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने लवकरच मतदार संघातील रेल्वे बाबतच्या सर्व सुविधा नागरिकांना मिळणार आहेत.
याप्रसंगी रेल्वे अधिकाऱ्यांसोबत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत माढा विधानसभेचे आमदार पाटील यांनी मतदार संघातील मोडनिंब येथे कार्गो टर्मिनल बाबत सविस्तर चर्चा केली. या कामाची अंतिम टप्प्यातील प्रक्रिया वेगाने सुरू आहे. हे काम पूर्ण करावे. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा माल कमी वेळेत आणि कमी खर्चात बाजारपेठेपर्यंत पोहोचविण्यास सहकार्य होईल असा विश्वास दिला.
यावेळी त्यांनी माढा – वडशिंगे महातपूर उड्डाणपुलाबाबत मागणी केली. त्यातील दोन पूल बांधणी बाबत मान्यता मिळाली असून व एकाचे सर्वेक्षण करण्याचे आश्वासन रेल्वे अधिकाऱ्यांनी दिले.
तसेच माढा रेल्वे सुशोभीकरण करण्याबाबत तसेच स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, प्रतीक्षालय (वेटिंग रूम) अशा सर्व सुविधा करण्याची मागणी केली. याचबरोबर पंढरपूर – मुंबई आठवड्यातून तीन वेळा रेल्वे आहे, ती रोज सुरू करावी अशी मागणी केली. प्रत्येक शनिवार रविवार मुंबई ते पंढरपूर – टू टायर -थ्री टायर डबे वाढवावे, अशी मागणी केली.
माढा रेल्वे स्टेशनवर कोरोना काळाच्या आधी सर्व रेल्वे गाड्या थांबत होत्या, परंतु आता फक्त दोनच गाड्या थांबतात. पूर्वीप्रमाणे सर्व गाड्या थांबल्यास सर्व प्रवाशांची सोय होईल. याबाबत सविस्तर चर्चा करून मागणी करण्यात केली.
कोरोना काळाच्या आधी सांगोला येथे कृषी रेल्वे सुरू होती व ती आता बंद आहे ती पुन्हा सुरू करावी, रेल्वे परिसरातील सर्व जागा विकसित करण्याबाबत सकारात्मक चर्चा केली.
सर्व मागण्यांबाबत अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
याबाबत माध्यमांशी बोलताना आमदार अभिजीत पाटील म्हणाले की; रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या मतदार संघातील विविध ठिकाणी रेल्वे सुविधेबाबत सविस्तर चर्चा करून जनहिताच्या मागण्या मांडल्या. या बैठकीत रेल्वे विभागाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पुढील काळात रेल्वे विभागाच्या सहकार्याने प्रवाशांना आणि विशेषकरून शेतकरी बांधवांना विशेष लाभ होणार असल्याचे सांगत सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा करणार असल्याचा विश्वास मतदार संघातील नागरिकांना दिला.