ताज्याघडामोडी

सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळेचा शिक्षक आ.संजयमामा शिंदे यांचा पी.ए.?

पगार शासनाचा आणि काम आमदाराचं ?
जनशक्तीचे अतुल खूपसे यांची चौकशी करून कारवाईची मागणी 

माढा तालुक्यातील निमगाव टें येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, येळे वस्ती येथे कार्यरत असलेला प्रविण नवनाथ शिंदे हा शिक्षक शाळेवर शिकवण्या ऐवजी करमाळा मतदार संघाचे आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडे स्वीय सहाय्यक म्हणून काम करत असल्याचा धक्कादायक खुलासा जनशक्ती संघटनेचे अतुल खूपसे पाटील यांनी केला असून यासंदर्भात गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांची सखोल चौकशी करून संबंधित शिक्षकावर कारवाई करावी अथवा तशाच प्रकारे मला जिल्हा परिषद शाळेचा शिक्षक पीए म्हणून देण्यात यावा अन्यथा जिल्हा परिषद सोलापूर येथे संबळ वाजवून आंदोलन करणार असल्याचा इशारा अतुल खूपसे पाटील यांनी एका निवेदनाद्वारे दिला.

या दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, सदरचा प्रवीण शिंदे नामक शिक्षक दि. १०/०८/१९९२ रोजी खडके वस्ती येथे जि. प. शाळेत रुजू झाले. त्यानंतर १९९९ साली टेंभुर्णी त्यानंतर २००० साली निमगाव (टें) नंतर २००१ मध्ये उपळवटे, २००१ मध्ये खडके वस्ती, २०१० मध्ये ताटे वस्ती दहिवली, २०१७ मध्ये गंगामाई नगर कारखाना आणि २०१८ मध्ये येळे वस्ती निमगाव(टें) येथे कार्यरत आहेत परंतु हे महाशय फक्त पेरपरवरच शाळेत आहेत.

यांचेच गावचे रहिवाशी असणारे विकासप्रिय, लोकप्रिय, शेतकऱ्यांच्या नावावर अफाट कर्ज काढणारे करमाळ्याचे नेतृत्व आमदार संजयमामा शिंदे यांचे खाजगी स्वीय सहाय्यक (पी.ए) म्हणून १९९२ पासून काम करत आहेत. पगार शासनाची घेतात परंतु काम आमदारचे करतात. ज्या शाळेत प्रविण शिंदे गुरुजी म्हणून सध्या कार्यरत आहेत त्या ठिकाणी पहिली ते चौथी असा वर्ग भरतो. ती शाळा आमदार महोदय संजयमामा शिंदे यांच्या गावातील येळे वस्ती या ठिकाणची आहे.

तेथे सुख सुविधांपासून वंचित असणारा समाज राहतो त्या विध्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यासाठी शासनाने दोन शिक्षक नियुक्त केले आहेत परंतु तेथे एकच शिक्षक काम पाहतो. त्या शाळेत १ ली ते ४ थी असे ४ वर्ग असल्याने पालकाने वर्गणी करून त्याठिकाणी अच्युत हरीलाल राजुरे या वडाचीवाडी ता. माढा येथील सुशिक्षित बेरोजगार तरुण विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी लावला आहे.

मात्र शासनाची पगार घेऊन आमदारची चाकरी करणाऱ्या शिक्षक(पी.ए) प्रविण शिंदे यांना बोलण्यास कोणताच पालक धजावत नसून विद्यार्थ्यांचे मात्र मोठे हाल होत आहेत. विशेष म्हणजे १९९२ पासून म्हणजे शिक्षक म्हणून पदभार घेतल्यापासून या शिक्षकाने शाळेचे तोंडही पहिले नाही. विद्यार्थ्यांची ओळखही नाही. त्याने शासनाचा सर्व मोबदला घेतला आहे. वेतनवाढ घेतली आहे, सुट्ट्या घेतल्या आहेत. तरी त्या शिक्षकाला त्वरित शाळेवर लावा आणि या शिक्षकाला पाठीशी घालणाऱ्या केंद्रप्रमुख व गटशिक्षण अधिकारी यांचेवर कायदेशीर कारवाई करा किंवा संजयमामा शिंदे हे करमाळ्याचे आमदार असले तरी मी देखील करमाळा विधानसभा लढलो आहे. म्हणून मला पण १ शिक्षक असाच पी. ए. म्हणून द्या किंवा तोच शिक्षक १५-१५ दिवस दोघांनाही द्या अन्यथा दि. १६/१०/२०२३ रोजी जि. प. सोलापूर यांचे समोर घटस्थापना करून बेमुदत आराधी मेळा आंदोलन करण्यात येईल. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील याची प्रामुख्याने नोंद घ्यावी.

जनशक्ती संघटनेचे अतुल खूपसे यांनी माध्यमांना दिलेल्या या माहितीची सत्यता पडताळून सोलापूर जिल्हा परिषदेचे संबंधित अधिकारी हि बाब गांभीर्याने घेणार का ? आणि चौकशी करून कारवाई करणार का ? याकडे  सोलापूर जिल्ह्यातील शैक्षणिक वर्तुळाचे लक्ष लागले असून एकीकडे शिक्षक संख्या कमी असल्याने शासन सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना तात्पुरती नियुक्त देण्याचा घाट घालत असतानाच दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या सेवेत असलेला शिक्षक खरेच आपले मूळ कर्तव्य सोडून राजकीय वशिल्यापोटी  इतर कामात व्यस्त नाही ना ?  याची चौकशी केली जावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.या चौकशीतूनच अतुल खूपसे यांनी केलेले वरील आरोप हे राजकीय हेतूने केलेले आहेत कि यात सत्यता आहे स्पष्ट होणार आहे.काही वर्षांपुवी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर राजकीय नेत्यांचे अधिपत्य असताना या बँकेचे कर्मचारी हे त्या त्या तालुक्यातील बँकेचे संचालक अथवा राजकीय नेते यांच्याकडे डिसीसी बँकेचा पगार घेऊन काम करीत होते असाही आरोप झाला आहे.पंढरपूर तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक तालुक्यात असे आरोप होताना दिसून आले आहेत.त्यामुळे राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर या गंभीर प्रकराची दखल घेत एकीकडे शिक्षक संख्या अपुरी असताना असे जे शिक्षक आमदार यांचे पीए म्हणून कार्यरत आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करतील का ? हाच प्रश्न उपस्थित होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *