गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

साईभक्त महिलांना अश्लील संदेश

शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या जनसंपर्क विभागातील एका अधिकाऱ्याने काही महिला भक्तांना मोबाइलद्वारे अश्लील संदेश पाठविल्याची तक्रार आली आहे. आसाम व मुंबईतील महिलांनी संस्थानकडे ही तक्रार केली आहे. याची सखोल चौकशी करण्याची मागणी शिवसेनेच्या स्थानिक महिला पदाधिकाऱ्यांनी शिर्डी संस्थानच्या सीईओ भाग्यश्री बानायत यांच्याकडे केली आहे.

शिवसेना महिला आघाडीच्या राहाता तालुका संघटक स्वाती सुनील परदेशी बानायत यांच्याकडे निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे त्यांनी म्हटले आहे की, संस्थानच्या जनसंपर्क कार्यालयातील एका अधिकार्‍याने मुंबई आणि आसम येथील साईभक्त महिलांशी प्रथम विविध कारणांतून जवळीक तयार केली.

त्यानंतर त्यांना मोबाईलवरून अश्लील व्हिडिओ पाठविले आहेत. या महिलांनी यासंबंधी शिर्डीच्या साईबाबा संस्थानकडे तक्रार केली आहे. त्या महिलांच्या या लेखी तक्रारीची दखल घेण्यात यावी. चौकशी करून दोषी आढळून येणाऱ्यांविरूद्ध कडक कारवाई करण्यात यावी. साईबाबा संस्थान हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आहे.

त्या ठिकाणी असे प्रकार होता कामा नयेत. आपण एक कर्तव्यदक्ष व शिस्तप्रिय अशा महिला अधिकारी आहात. त्यामुळे आपल्याकडून महिला भक्तांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. या गंभीर प्रकरणात आपण लक्ष घालून संबंधितांची चौकशी करून योग्य ती कडक कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

यासोबतच परदेशी यांनी या घटनेकडे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, साईबाबा संस्थानच्या तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश, धर्मादाय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांचेही लक्ष वेधले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *