ताज्याघडामोडी

मित्राने पागल म्हणत चिडवले; तरुण संतापला, घरात जाऊन चाकू आणला, अन् धक्कादायक कृत्य

कन्हान पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या इंदर कालरी क्रमांक ६ कोळसा खाण परिसरात एका १९ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. खून करणारा त्याचा मित्र आहे. सुनील चुन्नीलाल केवट असे मृतकाचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी आकाश राजेश राजभर याला अटक केली आहे. भरदिवसा तरुणाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत सुनील आणि आकाश हे दोघे चांगले मित्र होते. मृतक आरोपीला पागल – पागल म्हणत त्याची छेड काढत होता. त्यामुळे रागाच्या भरात आकाश त्याच्या घरी गेला आणि चाकू घेऊन आला. यानंतर तो थेट सुनीलच्या घरी गेला आणि छातीवर वार केला. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. कन्हान पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सार्थक नेहते, सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण, जयलाल सहारे, कोमल खैरे, अनिल यादव आदी पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले.

पंचनामा करून जखमी तरुणाला जे.एन. रुग्णालय येथे नेले असता तेथील डॉक्टरांनी तपासून राय हॉस्पीटल कामठी येथे पाठवण्यात आले. राय हॉस्पीटल येथे तरुणाला नेले असता डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी कामठी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे. घटनेची गंभीर दखल घेत नागपूर ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ.संदीप पखाले, उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक भाटकर यांनी घटनास्थळी भेट दिली. कन्हान पोलिसांनी आरोपी आकाश राजभर याला ताब्यात घेतले असून पुढील तपास कन्हान पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *