ताज्याघडामोडी

घराबाहेर फेरी मारली, दार उघडताच चिठ्ठी देत डाव साधला,राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षांवर जीवघेणा हल्ला

येथील राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रभारी जिल्हाध्यक्ष मनीषा पाटील यांच्यावर अज्ञात हल्लेखोराने चाकूने हल्ला करून खुनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मनीषा पाटील यांनी प्रसंगावधान राखून हातावर वार झेलल्यामुळे त्या बचावल्या असून हाताला गंभीर जखम झाली आहे. सध्या पाटील यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बचतगटाच्या टेंडर प्रक्रियेतील अनियमिततेविरोधात केलेल्या तक्रारींमुळे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी. एच. निपाणीकर यांचा हल्ल्यामागे हात असल्याचा संशय पाटील यांनी व्यक्त केल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रभारी जिल्हाध्यक्ष मनीषा राखुंडे पाटील यांच्या घरात बुधवारी सायंकाळी चेहरा कपड्याने बांधलेल्या अवस्थेत अज्ञात व्यक्तीने प्रवेश केला. हातात चिठ्ठी देऊन दुसऱ्या हाताने त्यांच्यावर धारदार चाकूने वार करून खुनी हल्ला चढवला. परंतु, प्रसंगावधान राखून पाटील यांनी तो वार हातावर झेलला. यात त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यांनी आरडाओरड करताच आजूबाजूच्या घरातील लोकांनी पाटील यांच्या घराकडे धाव घेतली, तेवड्यात हल्लेखोर मात्र पसार झाला.

मनीषा पाटील यांना जखमी अवस्थेत आनंदनगर पोलीस टाण्यात आणण्यात आलं. तेथून जिल्हा रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी. एच. निपाणीकर यांच्यावर संशय केला. निपाणीकर यांनी गुंडाकरवी हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप मनीषा पाटील यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *