बीडच्या जिल्हा परिषद कार्यालयासमोरील एका हॉटेलमध्ये मुख्याध्यापकाचा लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. त्यामुळे ही हत्या आहे की आत्महत्या, असा संशय व्यक्त केला जात होता. अखेर या मृत्यू प्रकरणाचं गूढ उकललं असून सदर मुख्याध्यापकाने पैशाच्या तगाद्याला कंटाळून गळफास घेत आपले जीवन संपवलं असल्याचं स्पष्ट झालं आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, भारत सर्जेराव पाळवदे (वय ४०, रा. सासुरा, तालुका केज) असे मृत मुख्याध्यापकाचे नाव असून ५ डिसेंबर रोजी रात्रीच्या वेळी या मुख्याध्यापकाचा मृतदेह जिल्हा परिषदेच्या समोरील एका हॉटेलमध्ये आढळला होता. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला. त्यानंतर मुख्याध्यापक पाळवदे यांनी लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागली. या चिठ्ठीतून पाळवदे यांच्या मृत्यूचं कारण समोर आलं आहे.
भारत पाळवदे शिक्षक जरी असले तरी ऊस तोडणी कामगारांचे मुकादम देखील होते. ऊस तोडणीसाठी कारखान्यातून मजुरांसाठी पैसे उचलून मजूर देण्याचं काम ते करत होते. मात्र कारखान्याला काही जण गेलेच नसल्याने सगळा भार पाळवदे यांच्यावर आला आणि त्यांच्यावर जवळपास ३० ते ३५ लाख रुपयांचा कर्जाचा डोंगर उभा राहिला. याच पैशासाठी काही खाजगी सावकारांनी त्यांच्याकडे पैशासाठी तगादा लावला. काहींनी शिवीगाळ देखील केली. यामुळेच मुख्याध्यापक पाळवदे हे १७ ऑगस्ट रोजी घरातून निघून गेले. दोन-तीन दिवस ते घरी न आल्याने कुटुंबियांनी केज पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार देखील नोंदवली होती.
कुटुंबियांच्या तक्रारीनंतर पोलीस प्रशासनाने भारत पाळवदे यांचा शोध सुरू केला होता. मात्र ५ डिसेंबर रोजी शिवाजीनगर ठाणे अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद कार्यालयसमोरील एका हॉटेलमध्ये मुख्याध्यापक पाळवदे यांचा मृतदेह आढळला. त्यामुळे ही हत्या की आत्महत्या, असा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर पाळवदे यांनी लिहिलेली तीन पानाची सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागल्यानंतर आता २३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाळवदे हे दिव्यांग होते आणि त्या अंतर्गत येणाऱ्या कायद्यान्वये या २३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे.