गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

निवडणूक प्रचार करताना तरुणाला उचलला; गावाबाहेर नेऊन केला खून

मिरज तालुक्यातल्या सोनी येथे निवडणुकी दरम्यान एका तरुणाचा खून झाला आहे. धारधार शस्त्रांनी वार करून ही हत्या करण्यात आली आहे. आकाश माणिक नरुटे (वय 22) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. मृत आकाश हा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता होता. या खून प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. मात्र या घटनेमुळे गावामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

मिरज तालुक्यातल्या सोनी ग्रामपंचायतीची निवडणूक सध्या सुरू आहे. निवडणुकी दरम्यान आकाश नरोटे, या पैलवान तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला आहे. सोमवारी रात्रीच्या सुमारास आकाश हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या निवडणुकीचा गावात प्रचार करत होता. यावेळी आकाशाला काही जणांनी बोलवून त्याला दुचाकीवरून घेऊन गेले. त्यानंतर गावापासून काही अंतर असणाऱ्या करोली रस्त्यावरील इंग्लिश स्कूलजवळ तिच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला करून त्याचा निर्घृण खून करण्यात आला.

रात्री उशिरा पर्यंत आकाश हा घरी न आल्याने त्याच्या नातेवाईकांनी शोध सुरू केला असता, इंग्लिश स्कुलच्या मैदानात तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला. आकाश हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते व माजी कृषी उत्पन्न समितीचे माजी सभापती दिनकर पाटील यांचा कार्यकर्ता आहे. गावात सध्या ग्रामपंचायतची निवडणूक सुरू असून या ठिकाणी दिनकर पाटील आणि भाजपाचे राजू पाटील यांच्यामध्ये काट्याची लढत सुरू आहे.

दरम्यान आकाशाचे गावातल्या काही जणांच्या सोबत काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. या भांडणातून ही हत्या करण्यात आल्याची चर्चा सध्या गावात सुरू आहे. तर या खुनाची मिरज ग्रामीण पोलिसात नोंद झाली असून याप्रकरणी मिरज पोलिसांनी दोघांना ताब्यात देखील घेतले. हत्या नेमकी कोणत्या कारणावरून करण्यात आली आहे याबाबतचा तपास सुरू असल्याची माहिती मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *